लग्नसमारंभासाठी 50 व्यक्तींना परवानगी नॉन एसी मंगल कार्यालयांना ही परवानगी

 कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अमरावती, दि. 26 : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेनुसार लग्नसमारंभाला घालण्यात आलेली 25 उपस्थितांची मर्यादा वाढवून 50 वर नेण्यात आली आहे. त्यामुळे वर, वधू, नातेवाईक, भटजी, आचारी व वाजंत्री आदींमिळून 50 व्यक्तींना लग्नसमारंभासाठी उपस्थित राहता येईल. त्याशिवाय, विनावातानुकुलित मंगल कार्यालये, सभागृहांमध्ये लग्नसमारंभ आयोजित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी तसा आदेश आज निर्गमित केला. त्यानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत लग्नसमारंभ आयोजित करता येईल. लग्नसमारंभ वर किंवा वधूचे घर, त्याचप्रमाणे, नॉन एसी मंगल कार्यालये, खुले लॉन, सभागृहात करता येईल. मात्र, एका ठिकाणी एका दिवशी एकच लग्नसमारंभ होईल व केवळ 50 व्यक्तीच उपस्थित असतील.  वाजंत्री पथकाला केवळ लग्नस्थळीच वाद्ये वाजविण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे, त्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे.

*नियमभंग केल्यास दंड व फौजदारी* 

लग्न समारंभाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर व सर्व नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे. कुठेही नियमभंग आढळल्यास आयोजकाला 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, वधू-वर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

*लेखी स्वरूपात परवानगी आवश्यक*

लग्नसमारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित उपस्थित व्यक्तींच्या यादी सादर करून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती शहरासाठी महापालिका आयुक्तांना, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधितांनी परवानगी देताना सर्व लोकांची कोविड तपासणी झाल्याची खात्री करूनच परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा दंडाधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.
Previous Post Next Post
MahaClickNews