जिवेत् शरद् शतम् - निसर्ग प्रेमी श्याम देशपांडे

 जिवेत् शरद् शतम्  -निसर्ग प्रेमी श्याम देशपांडेएखाद्या व्यक्तिचा स्वभावच मुळी प्रेमवेडा असतो असे म्हटले तर ते पटणार नाही. परंतू अमरावतीचे सुप्रसिध्द पत्रकार, साहित्यीक, कवि, निसर्गप्रेमी व मित्रांवर जिवापाड प्रेम करणारे श्याम देशपांडे आज त्यांचा वाढदिवस. वाढदिवस म्हटला की जुने दिवस फ्लॅश बॅक प्रमाणे डोळ्यासमोर येतात. 

श्याम देशपांडे मुळचे हाडामासाचे शिक्षक. त्याकाळी शिक्षक पत्रकारारितेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होते. नव्हे, वृत्तपत्र क्षेत्राला शिक्षक असलेल्यांची गरज होती. नागपुरच्या नागपुर टाईम्स मध्ये ते सेवा देत. मराठीत जसे कान्हा, मात्रा, वेलांटीचे महत्व असते तितक्याच बारकाईने ते इंग्रजीत बातमी लिहीत असत. कोणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेत मर्मावर घाव करणारे त्यांचे लिखाण असायचे. त्याकाळी दै. हिंदुस्थान मध्ये रात्री बर्‍याच उशिरापर्यंत अरुण मराठे म्हणजे माझे मोठे भाऊ यांचेसोबत ते गप्पा मारत असत. माजी आमदार बी. टी. देशमुख, शरदचंद्र सिन्हा, मधुकर केचे, माणिक कानेड इतकेच काय तर मा.ल. व्यवहारे, धैर्यशिल वाघ, सुरेश भट यांची गप्पांची मैफिल जमत असे. पत्रमहर्षी स्वतंत्रता सेनानी बाळासाहेब मराठे यांचेसोबत राजकारण, जिल्ह्यातील विविध विकास योजना, शिक्षण, मेळघाट टायगर प्रोजेक्ट, अमरावती शहरातील वाढीव पाणी पुरवठा, अमरावती बायपास आदीबाबत चर्चा करीत असत तर सुर्यकांत जोग यांनी सुरू केलेल्या संस्कार शिबीरात ते तरूणाईला मार्गदर्शन करीत.

हँन्ड कंपोज केलेल्या बातमीचे प्रुफ रिडींग पासुन त्यांचे डॉक्टरांना म्हणजे अरुण मराठे यांना सहकार्य असेे. दै. हिंदुस्थानचा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा. दै. हिंदुस्थानमध्ये “ मालटेकडीचा माथा ” हे सदर अनेक वर्ष त्यांनी चालवले. आपले मत स्पष्टपणे सांगणारा तो अरुण मराठे यांचा खरा व विश्‍वासु मित्र.  दोघेही पर्यावरणाचे संरक्षक मित्र. अमरावतीच्या सभोवताल वृक्ष लागवडीत त्यांचा सिंहाचा वाटा, पोहरा असो वा मेळघाट त्यांची झाडासोबत जणू मैत्री. पक्षी असो वा प्राणी त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न, पक्षांची ओळख असणारा हा पक्षी मित्र.

मोर्शी रस्त्यावर कडेला असलेला केकतपुरचा तलाव. वेळ सकाळच्या अकरा-सव्वा अकराची. डिसेंबरच्या गारव्यात लोळणारी मार्दची उन्हं. तलावातील पाणी बरेचसे आटलेले. थोडी स्तब्ध वाटणारी पिकल्या शेताच्या स्वभावात रमणारी आणि मध्यान्हाकडे झुकणारी सकाळ. तलावाच्या काठा लगतच्या कोरड्या पात्रावर पक्ष्यांचा एक थवा. पात्रात वाळत टाकलेल्या करड्या राखाडी रंगाच्या शालीसारखा... या सामान्य क्रौंच पक्षाचे निरीक्षणही श्याम अतिशय हळूवारपणे नोंदवितात. कसा दिसतो हा पक्षी? श्यामदादा नोंद करतो. हिरवट, राखाडी, किंचितशी लांब चोच, डोक्यावर शिरोभागी मांसाच्या गोळ्यासारखा दिसणारा लांबट तुकडा, लालसर-पिंगट वर्तुळात बांधलेले सुरेख डोळे आणि काजळी काळ्या रंगाची मान, हनुवटी अन् कपाळ. तसल्याच भुरकट काजळी रंगाचे पाय आणि तळवे. पंखाची टोके काळी. पंख विस्तीर्ण-शेपूट लपविणारे... लपलेल्या शेपटामुळे पंखांचा एक गुच्छ मागे लटकणारा. मान उंच अन् बांधा कमनीय... असा त्यांचा पक्षांबद्दलचा अभ्यास. 
निरीक्षण आणि भाषा यांच्या मेळामुळे सामान्य क्रौंच पक्ष्याचे सुरेखसे चित्रण श्याम वाचकांपुढे उभे करतात.  ज्याप्रमाणे पक्षांवर त्यांचे प्रेम त्याप्रमाणे झाडांवरही तितकेच प्रेम करणारा वृक्षवेडा म्हणजे श्याम दादा. 

एकदा आम्ही म्हणजे मी, डीएफओ राजेंद्र कदम व श्याम देशपांडे पोहरा, चिरोडी जंगलात फिरावयास गेलो. कांही काळ चांदुर रेल्वे येथील वन विभागाच्या विश्रामगृहात चहाला थांबलो. बरेच फिरणे झाल्याने आम्ही थकलो होतो. पण श्याम देशपांडे परिसरात लावलेल्या झाडांचे निरीक्षण करित फिरत होते. एका झाडाला तार गुंडाळलेली दिसली. श्याम देशपांडे यांनी लगेच अर्धातासाचे अथक प्रयत्नानंतर झाडाला गुंडाळ्ल्या गेलेल्या तारेतुन मुक्त केले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मार्डी मार्गाचे रस्ता रुंदीकरणात पिवळा पळस वृक्ष तोडल्या जाणार कळताच पायाला मोठी दुखापत असूनही सेवानिवृत्त वन अधिकारी स्व. भोसले साहेब यांना घेऊन आंदोलन करणारे श्याम दादा तर छत्री तलावास लावलेल्या काटेरी कुंपणाने वन्यजीवांना होणारा धोका व जात असलेले वन्य प्राण्यांचे प्राण डोळ्यात पाणी आणून संबंधितांना सांगणारे श्याम अनेकांनी पाहिले आहे.

मेळघाट व पोहरा जंगलासह जिल्ह्यात असलेल्या राखीव, सुरक्षित आदि जंगलांची इत्यंभूत माहिती त्यांना आहे. एका बिबट मादीला तिन पिले झाल्याची खबर त्यांनी वनविभागाला दिली. जंगलात वणवे पेटले की त्यांच्या शरीराची जणू त्राही त्राही होत असे. त्यांची पत्नी सौ. शिला देशपांडे यांच्या स्मृतीदिनी ते वृक्ष लागवड करुन तिच्या स्मृतीला उजाळा देतात. त्यात त्यांचा मुलगा अभिषेक यांचा मोठा वाटा असतो.
अरुणदादा मराठे यांचे प्रमाणे पत्रकार, साहित्यीक वामन तेलंग हे त्यांचे जीवाभावाचे मित्र. त्यांच्या सुखदु:खांचा सखा. अनेक साहित्यीक, कवी, पत्रकार, निसर्गप्रेमी यांच्यासोबत मैत्री करणारा या निसर्ग मित्राचा आज 77 वा वाढदिवस. आमच्या श्याम दादांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

उल्हास बा. मराठे
9403408581
Previous Post Next Post
MahaClickNews