मनरेगा'मध्ये रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्हा राज्यात पहिला

अमरावती, दि. 25  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. 2020-21 या वर्षात अमरावती जिल्ह्यात 96 लक्ष 51 हजार मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाली आहे. पालघर जिल्ह्यात 46 लक्ष 69 हजार मनुष्यदिन, तर गोंदिया जिल्ह्यात 45 लक्ष 98 हजार मनुष्यदिन निर्मिती होऊन ते अनुक्रमे दुस-या व तिस-या क्रमांकावर राहिले आहेत.

    गतवर्षी कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर लॉकडाऊन झाले. शहरांत अनेक कामे बंद झाल्याने नागरिक गावोगाव परतून मेळघाटसह ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. या काळात स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्यात ‘मनरेगा’ने मोलाची भूमिका बजावली. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या व जलसंधारण, रस्तेविकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. गावपातळीवरील कामाची गरज व त्यातून विविध विकासकामांना चालना यांचा सर्वंकष विचार करून सूक्ष्म नियोजन करण्याबाबत स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या.  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या नियोजनात शेततळे, ढाळीचे बांध, वनतळे, वृक्षलागवड, रोपवाटिका, घरकुल, सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर अशा अनेक कामांचा समावेश करण्याची सूचना केली. त्यामुळे गत एप्रिलपासून मोठी रोजगारनिर्मिती व्हायला सुरुवात झाली, असे रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सांगितले.

 
जिल्ह्यात गत वर्षभरात 96.51 लक्ष मनुष्यबळदिन निर्मिती झाली. या योजनेत मजुरीवाटप आदी कामे वेळेत केल्याने खर्चातही जिल्हा आघाडीवर राहिला. 240 कोटी 61 लाख 51 हजार खर्च करण्यात आला आहे. कोरोना साथ लक्षात घेऊन एप्रिलपासून अधिकाधिक रोजगारनिर्मितीवर भर दिला. एप्रिलमध्ये सुरुवातीला दैनिक मजूर उपस्थिती 19 हजार 346 होती. तीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ती मे महिन्यात 96 हजार 930 पर्यंत एवढी झाली. आता विविध योजनांची मनरेगाशी सांगड घालून अभिसरणातून कामे राबविण्यात येणार असल्याचेही श्री. लंके यांनी सांगितले.

योजनेचे सूक्ष्म नियोजन व रोहयो विभाग, तालुका प्रशासन व इतर विभागांचे उत्तम टीमवर्क यामुळे कोविडकाळात अधिकाधिक गरजू नागरिकांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळू शकला


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या गावात रोजगार मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली. अधिकाधिक रोजगारनिर्मितीसाठी सूक्ष्म नियोजनावर भर दिला गेला. आता पुढील वर्षासाठी ‘मनरेगा’तून भरीव रोजगारनिर्मितीसाठी 4 हजार 393 कोटीचे लेबर बजेट तयार केले आहे. ज्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अडीचपट  रोजगारनिर्मिती होईल _पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
----------------------------------
2020-21 या वर्षात 84 लक्ष 66 हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट होते. ते आधीच पूर्ण होऊन 24 मार्चपर्यंत 96 लक्ष 51 हजार मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. उद्दिष्ट्याच्या तुलनेत हे प्रमाण 114 टक्के आहे. _जिल्हाधिकारी शैलेश नवाल
--------------------------------Previous Post Next Post
MahaClickNews