अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रमासाठी जिल्ह्यांना अनुदान कामांना मिळणार चालना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

अमरावती, दि. 22 : अल्पसंख्याकबहुल नागरी क्षेत्रविकासासाठी जिल्ह्यांना अनुदान वितरीत होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यानुसार दर्यापूर नगरपरिषदेतील मुस्लिमबहुल वस्तीतील रस्ता, कब्रस्तान आदी कामांना चालना मिळणार आहे. इतर कामांसाठीही आवश्यक  निधी मिळण्यासाठी जोरदार पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी  दिली.

            राज्यातील बहुल अल्पसंख्याक नागरी क्षेत्र विकास योजनेसाठी 2020-21 या आर्थिक वर्षात 44 कोटी 63 लक्ष निधी अर्थसंकल्पित करण्यात आला. कोविड संकटामुळे निधी वितरणात अडचणी आल्या. या योजनेत 4 कोटी 46 लक्ष निधी यापूर्वीच वितरीत झाला. मात्र, कामांचे प्राधान्य लक्षात घेऊन दुस-या टप्प्यातील निधीही मिळावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली होती. दर्यापूर येथील कामांबाबत आमदार बळवंतराव वानखडे यांनी पाठपुरावा केला.  

आता आणखी 9 कोटी 20 लक्ष रूपये निधी मंजूर करून अल्पसंख्याक विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयांकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपरिषदेअंतर्गत मुस्लिम वस्तीत रस्ते, नाला, कब्रस्तान आदी विकासकामांसाठी 25 लक्ष रूपये निधी वितरीत करण्यात येत आहे.

अल्पसंख्याकबहुल नागरी क्षेत्रात अधिकाधिक विकासकामे राबविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. कोविड महामारीमुळे निधी वितरणात अडथळे आले तरी अपेक्षित कामांचे प्राधान्य लक्षात घेऊन पुढील टप्प्यातील निधी मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.
Previous Post Next Post
MahaClickNews