विकासकामांना मिळणार गती - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 23 : प्रादेशिक पर्यटन योजनेत सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील नियोजित विकासकामांसाठी दुस-या टप्प्यात 30 लाखांचा निधी वितरीत झाल्याने तेथील पायाभूत सुविधा व सौंदर्यीकरणाच्या कामांना गती मिळणार आहे. पुढील टप्प्यातील निधीही वेळेत मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्यात विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली._

प्रादेशिक पर्यटन योजनेत भातकुली तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील विकासकामांसाठी 2 कोटी 5 लक्ष रूपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी 30 लक्ष रूपये निधी यापूर्वी प्राप्त झाला. उर्वरित सर्व कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, निधी उपलब्ध नसल्याने कामात अडथळे आले. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन पाठवून याबाबत पाठपुरावाही केला. त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे धामोरी येथील विकासकामांसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे.

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी  पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक विकास पर्यटन योजना राबवली जाते. आदर्श ग्राम धामोरी येथे पायाभूत सुविधांसह सौंदर्यीकरणाची अनेक कामे 2 कोटी 5 लक्ष रूपये निधीतून केली जाणार आहेत.  

धामोरी येथे मुख्य रस्त्यापासून तलावापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉकने सुधारणा करण्यासाठी 43 लक्ष 30 हजार, स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी 11 लक्ष 70 हजार, धामोरी येथील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 25 लक्ष, तलावाच्या आऊटलेटवर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी 22 लक्ष निधी मंजूर आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने व बाळगोपाळांसाठी खेळण्यासाठी 40 लक्ष रूपये निधीतून भव्य खेळणीही बसविण्यात येणार आहेत.

धामोरीतील विद्युतीकरण व सौर वीज पथदिव्यांसाठी 25 लक्ष 60 हजार रूपये, तर पेयजल उपाययोजनांसाठी 20 लक्ष 50 हजार रूपये निधी मंजूर असून, आकस्मिक खर्चाची तरतूद 7.52 लक्ष, सेंटेज चार्जेस 9.40 लक्ष तरतूदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने शासनाकडून निधी वितरीत होत आहे.

पुढील अपेक्षित कामांसाठीही वेळोवेळी पाठपुरावा करून निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.
Previous Post Next Post
MahaClickNews