मुख्य वनसंरक्षकाच्या अटकेची मागणी
- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
धारणी,
वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांच्या आत्महत्ये प्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे.दीपाली यानी गुरुवारी रात्री हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. घटनास्थळी त्यांनी अपर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या नावाने लिहून ठेवलेली चार पानांची सुसाईड नोट सापडली होती. या नोटमध्ये दीपाली यांनी उपवनसंरक्षक शिवकुमार यांच्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. त्यांच्या जीवघेण्या कार्यपद्धतीमुळे माझा गर्भपात झाल्याचेे नमूद केले आहे. तसेच वारंवार तक्रार करून रेड्डी यांनी शिवकुमार यांच्यावर काहीच कारवाई केली नसल्याचेही त्यांनी लिहले आहे.
या शिवाय अन्य गंभीर आरोप त्यांनी सुसाईड नोटमधून केले आहे. धारणी पोलिसांनी या नोटच्या आधारे गुरुवारी रात्रीच गुन्हा दाखल करून शिवकुमार यांचा शोध सुरू केला होता. मात्र ते फरार झाले होते. धारणी पोलिस व गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजता पळून जाण्याचा बेतात असलेल्या शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. दरम्यान दिपालीच्या आईने जोपर्यंत शिवकुमारला फाशीची व रेड्डी यांना अटक होत नाही, तो पर्यंत दिपलीच्या मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. भाजपानेही कठोर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.