महिला वन परिक्षेत्र अधिकारी आत्महत्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

विशाखा समित्या तात्काळ कार्यरत करा- सर्व विभागीय आयुक्तांना दिले निर्देश 


  मुंबई, दि. 26: हरीसाल, ता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

श्रीमती दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या घालुन दि. २५ मार्च, २०२१ रोजी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुगामल वन्यजिव विभाग, चिखलदरा चे उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तरी या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्वरित निलंबण करण्यात यावे, अशी मागणी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

त्याचबरोबर या आत्महत्या प्रकरणात दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री ॲड. ठाकूर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

विशाखा समित्या तात्काळ कार्यरत करा

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार राज्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समित्या स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून जर कोठे या समित्या कार्यान्वित नसल्यास त्या तातडीने पंधरा दिवसांच्या आत कार्यान्वित कराव्यात तसेच या समित्यांच्या नियमित बैठका घेऊन महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे, असे निर्देशही ॲड. ठाकूर  यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. 

संकटग्रस्त महिलांनी थेट संपर्क साधावा*

लैंगिक, मानसिक छळाची समस्या असल्यास महिलांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews