विविध कृषी योजनांचा आढावा पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश

अमरावती, दि. 22 : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमात केंद्र शासनाकडून अमरावती जिल्ह्याला संत्रा फळपीकाबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार कृषी व फलोत्पादन प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यासाठी परिपूर्ण नियोजन सादर करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

            विविध कृषी योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे उपस्थित होते.

 पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी कृषी प्रशासनाकडून जिल्ह्याची स्थिती लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करणे अपेक्षित आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत फळप्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यासाठी भरीव प्रयत्न करावेत. पुढील हंगाम लक्षात घेता बियाण्याच्या उपलब्धतेसाठी अभियान राबवावे. सोयाबीन बियाण्याचे जतन व ते परिसरातील गरजूंना उपलब्ध करून देणे, त्याची उगवणक्षमता तपासणे, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रोत्साहित करावे.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांच्या कामांना अधिक चालना मिळावा. ठिकठिकाणी गट स्थापन व्हावेत जेणेकरून अनेक नाविन्यपूर्ण आणि शेतकरी हिताचे उपक्रम राबविणे शक्य होईल.  विकेल ते पिकेल उपक्रमांतर्गत 122 गटांमार्फत थेट शेतमाल विक्रीसाठी विक्रीस्थळे स्थापण्यात आली. मात्र, या कामाचा विस्तार होणे आवश्यक आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातही (स्मार्ट) प्राप्त अर्जांवर तातडीने प्रक्रिया करून संबंधितांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

कृषी विभागाकडून योजनांच्या होणा-या अंमलबजावणीबाबत पुढील आठवड्यात सविस्तर आढावा घेतला जाईल. त्यासाठी परिपूर्ण नियोजन व माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews