अमरावती, दि. २७ : कोरोना साथ लक्षात घेऊन नागरिकांनी होळी सण साधेपणाने व गर्दी टाळून साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
सणाबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अमरावतीकरांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.
कोविडच्या अनुषंगाने यंदा सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या अमरावती शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी २८ व २९ मार्च रोजी चा ‘होळी उत्सव’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा व पालिका प्रशासनाने केले आहे.
होळीचा सण साधेपणाने साजरा करून प्रदूषण टाळावे व सुरक्षितता जोपासावी. यंदा सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे असे आवाहन केले आहे.