दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून मुख्य वनसंरक्षकांना नोटीस जारी- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 31 : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार व्यक्तींना शिक्षा होण्यासाठी शासनाकडून गंभीर पावले उचलण्यात येत आहेत. अशी प्रकरणे घडू नयेत यासाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार आहोत. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षकांना नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनिमय 1993 अंतर्गत कलम 10 (1) (क) (एक) व (दोन) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये वनसंरक्षकाचे नाव असल्याचा उल्लेख असलेली बातमी माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे, आयोगाला प्राप्त झालेले विविध ई-मेल लक्षात घेता आयोगाने या प्रकरणी दखल घेत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना नोटीस जारी केली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलेला मानसिक त्रास होऊन आत्महत्या होणे ही अत्यंत दुर्देवी घटना असून, आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे. या प्रकरणी आपला उल्लेख होत असल्याने आपला लेखी खुलासा आयोगाच्या कार्यालयात आठ दिवसांच्या आत प्रत्यक्ष किंवा आपल्या वकिलामार्फत सादर करण्याचे नोटीशीत नमूद आहे. आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी ही नोटीस जारी केली आहे.

                                    
या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल. दोषींची गय केली जाणार नाही. कुठेही अपप्रकार घडत असेल तर महिलांनीही निर्भिडपणे पुढे  येऊन महिला आयोगाकडे तक्रार करावी. मी रोज सर्व तक्रारींचा आढावा घेणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews