शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ महाविद्यालयांनी महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे अर्ज परिपूर्ण भरून घ्यावेत-

सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) मंगला मून

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in/ संकेतस्थळ उपलब्ध 


अमरावती, दि. 17 : महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित व नुतणीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण भरून घेऊन पोर्टलला सादर करावे. विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती व मार्गदर्शन करावे, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाव्‍दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विभागाव्दारे महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी अनुक्रमे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर शिक्षण फी परीक्षा, परीक्षा फी, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येते.

महाडीबीटी प्रणालीवर सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील उपरोक्त योजने अंतर्गत प्रवेशित (नवीन) व नुतणीकरणाचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घेऊन विद्यार्थ्यांना याविषयी सूचित करावे.

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांकडून विहीत मुदतीत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार. महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews