अमरावती
अपात्र असताना देखील अधिष्ठाता पदी रुजू झालेले डॉ.फुलसिंग रघुवंशी यांचे वेतन राज्य शासनाकडून मान्य होत नसल्यामुळे त्यांना आता विद्यार्थ्यांच्या पैशातून जमा होणाऱ्या जनरल फंडातून वेतन देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आलेला आहे. जनरल फंडातील पैश्यांची उधळपट्टी प्रशासनाने आपल्या मनर्जीने करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरीही आपण केलेल्या पापाची फळ विद्यार्थ्यांना भोगावी लागू नये यासाठी हा प्रकार तातडीने रोखावा व सामान्य निधीतून कुणाचाही पगार देऊ नये अशी मागणी करत युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांनी कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर यांना आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
डॉ.एफ.सी.रघुवंशी यांच्या पात्रतेवर उच्च शिक्षण विभागाकडून प्रश्न उपस्थित झालेला असल्याने भविष्यात त्यांच्या वेतनासाठी एकही रूपया विद्यापीठाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे त्यांना जनरल फंडातून वेतन दिल्यास तो विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा निव्वळ उधळला जाणार आहे. डॉ.रघुवंशी हे अपात्र असताना देखील त्यांना पदावर ठेवणे ही स्वत: आपली जबाबदारी असून मा. कुलगुरूंनी आपल्या खिशातून त्यांचे वेतन द्यावे, कोणत्याही परिस्थितीत जनरल फंडाचा पैसा त्यांच्या वेतनावर उधळू नये अशी विनंती सागर देशमुख यांनी आपल्या पत्रातून केली आहे. तसेच याबद्दलची माहिती त्यांनी उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना यशोमती ठाकूर यांना सुद्धा दिली
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पैशांची सुरू असलेली उधळपट्टीचा कळस आता होत चालला असून अपात्र अधिकाऱ्याला वेतन देऊन विद्यार्थ्यांच्या विकासावर त्यामुळे परिणाम होणार आहे. ही रक्कम कमीजास्त प्रमाणात १ कोटींच्या घरात जाणार असून एवढी सहज बाब नाही. प्रशासनाला शासनाकडून वेतन प्राप्त करणे अशक्य होत असल्यास कुलगुरूंनी डॉ.रघुवंशी यांना पदावर हटवून नवीन पात्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तरीही विद्यापीठाने जनरल फंडातून वेतन देण्याचे पाऊल उचलल्यास युवक काँग्रेसला या विषयावर तीव्र आंदोलन करण्याची वेळ येईल. तसेच कोणत्याही परिस्थितीत युवक काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पैशाची उधळपट्टी होऊ देणार नाही असा इशारा युवक काँग्रेसचे युवा नेते सागर देशमुख यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.