आझाद हिंद मंडळातर्फे सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अमरावती प्रतिनिधी,
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि रक्ताची गरज लक्षात घेता ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हे बोधवाक्य कृतीतून अंगीकारण्याच्या उद्देशाने आझाद हिंद मंडळातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार आझाद हिंद मंडळातर्फे मंडळाचे कार्यकर्ते सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीराचे आयोजन १ मे,२०२१ रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत केले आहे.
कोविड-१९ या आजाराने जगभरात थैमान मांडले आहे. देशात व राज्यातही या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली होती. मात्र, रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून व इतर दक्षता घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय आझाद हिंद मंडळाने घेतला. संचारबंदीचा भंग न करता, पण काळाची गरज लक्षात घेऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि शिस्त पाळून रक्तदान करावे. शासनाच्या  नियमांचे पालन करून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून रक्तपेढ्या वा रक्तदान शिबिरे संकलनाचे काम करत आहेत. म्हणूनच गटाने एकत्र बाहेर न पडता, एकट्याने जाऊन रक्तदान करावे असे आवाहन आझाद हिंद मंडळाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी पुढाकार घ्यावा व रक्तदात्यांनी रक्तदान करावे.
अमरावती शहराची गरज लक्षात घेऊन शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन टप्याटप्याने; पण नियमितपणे करण्यात येणार आहे. त्यामुळे रक्ताची  गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त पुरविण्यास मदत होणार आहे. 
अमरावती शहरामध्ये  रुग्णांना रक्ताची गरज असते. गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, गर्भवती माता, स्तनदा माता, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, तसेच थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. थॅलेसिमिया, सिकलसेल आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना नियमितपणे रक्त संक्रमण करून घ्यावे लागते. थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्ताची सर्वात जास्त गरज भासते. अशा रूग्णांमध्ये १५ ते २१ दिवसांनी रक्त संक्रमण करून नवीन रक्त देण्याची गरज असते. अशावेळी रक्त संक्रमण करतांना अनेकदा एक युनिट रक्त पुरत नाही. वयाने मोठ्या रुग्णांना २ युनिट्स रक्तही लागू शकते. प्रत्येक रुग्णांसाठी हे प्रमाण वेगवेगळे असते आणि ही प्रक्रिया आयुष्यभर नियमितपणे करावी लागते. केवळ थॅलेसिमियाग्रस्तच नव्हे, तर इतरही विविध आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. शस्त्रक्रिया, अपघात, डिलीव्हरीज या सगळ्यासाठी ब्लड बँकेत रक्त असणे गरजेचे असते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन आझाद हिंद मंडळांनी केले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अनेकदा शंकाकुशंका व्यक्त होत असतात. सध्याच्या परिस्थितीत रक्तदान कितपत सुरक्षित आहे, असेही विचारले जाते. मात्र, पुरेशी काळजी घेतली तर सुरक्षितपणे रक्तदान करता येणे शक्य आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews