पालकमंत्र्यांचा मेळघाटातील नागरिकांशी थेट संवाद; प्रशासकीय कामांना वेग

समस्यांच्या तत्काळ निराकरणाचे प्रशासनाला निर्देश 

 पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर 


अमरावती, दि. 20 : मेळघाटातील नागरिकांच्या विविध समस्यांची दखल घेऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नुकताच मेळघाटचा गोपनीय दौरा केला. या अभ्यासदौ-यात त्यांनी दुर्गम गावांना भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण तत्काळ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

 दोन दिवसांच्या या दौ-यात पालकमंत्र्यांनी मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या, आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. मांगीया, जेतादेही, मोथा, हरिसाल अशा विविध गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. जेतादेही परिसरात रोजगाराची अडचण पाहता मनरेगातून अधिकाधिक कामे राबवावीत. तेथील पेयजलाचा प्रश्नही प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळेत प्रस्ताव व कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 मोथा येथील आरोग्य उपकेंद्र व सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित तपासण्या व उपचार व्हावेत. साधनसामग्रीबाबत कुठलीही अडचण असेल तर तत्काळ जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा. अनेक नागरिकांत हिमोग्लोबीनची कमतरता जाणवत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे याबाबत शंभर टक्के नागरिकांच्या तपासण्या करून उपचारासंबंधी उपाययोजना करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

            मांगीया गावातील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. पुनर्वसन झालेल्या नागरिकांची बँक खाती पुनर्वसित भागातील बँकेत ट्रान्सफर व्हावीत. रोजगारनिर्मितीसाठी अधिकाधिक कामे राबवा. वन्यजीव विभागातील एमएससीआयटी प्रशिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

बोरी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेसह वनौषधी व दुर्मिळ वनस्पती संकलन केंद्राची पाहणीही त्यांनी केली. लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रालाही त्यांनी भेट दिली. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी व विविध वनाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews