केंद्रिय आरोग्य पथकाकडून ग्रामीण उपचार यंत्रणेची पाहणी

अमरावती, दि. 9 :  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने अचलपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविड उपचार केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

या पथकात दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा समावेश आहे.  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह स्थानिक आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पथकाने अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण प्रक्रिया व स्टाफबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी वलगाव येथील कोविड केअर सेंटर आणि अचलपूर येथील कुटीर रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. कोरोना उपचारांबाबत व उपलब्ध साधनसामग्रीबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.

पथकाने त्यानंतर देवमाळी येथील कंटेनमेंट झोनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता त्रिसूत्रीचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देश पथकाने यंत्रणेला दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews