कोरोना उपचारांत आवश्यक साधनसामग्रीबाबत शासनाकडून सर्वंकष प्रयत्न पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

ऑक्सिजनप्रकल्प निर्मिती व उभारणीसाठी खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार 


अमरावती, दि. 20 : कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी रेमडीसिविर, ऑक्सिजन व इतर साधनसामग्रीसाठी राज्य शासनाकडून सर्वंकष प्रयत्न होत असून, ऑक्सिजनप्रकल्प निर्मिती व उभारणीसाठी खरेदीचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून, त्याला नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन संचारबंदी निर्बंध अधिक कडक केले आहेत. मात्र, नागरिकांचे जीवाचे संरक्षण करून त्यांना सुखरूप ठेवणे हे सध्याचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे या नियमांचे कसोशीने पालन करावे. आपली बेशिस्ती ही दुस-याचा जीव धोक्यात आणू शकते, याचे भान ठेवावे. अनेकदा नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतात, कारवाई करावी लागते, नागरिकांच्या संरक्षणासाठी तसे निर्णय घेतले जातात. त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

या काळात कोरोना उपचारांत आवश्यक साधनसामग्रीसाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. रेल्वेवाहतुकीद्वारे जलदगतीने ऑक्सिजनच्या वाहतूक सुरु करण्यात आली असून, विशाखापट्टणम येथून राज्यात ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ रवाना झाली आहे.  कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. प्रमुख सात रेमिडिसिव्हीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. शासनाने केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती केली आहे. रेमिडिसिव्हिर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. अनेक पातळ्यांवर लोककल्याणकारी निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. कोरोना संसर्गामुळे खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या अनुसूचित जमातीच्या रुग्णासाठीच्या रेमडीसेव्हीर इंजेक्शनवर येणारा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांना न्युक्लिअस बजेटमधून 10 लाख रुपयापर्यंत निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आदिम जमाती, विधवा, परितक्त्या, निराधार महिला, अपंग, दारिद्र्यरेषेखालील रुग्णांचा प्राधान्याने विचार करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. अशा विविध प्रयत्नांना आता नागरिकांनी नियम काटेकोरपणे पाळून साथ देण्याची गरज आहे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

 *‘पॅनिक’ नको, पण दक्षता घ्या : जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

            जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संचारबंदीत आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर लवकरात लवकर ऑक्सिजन प्लॅन्टसाठी प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनीही या काळात संयम व स्वयंशिस्त पाळावी. पुरेशी दक्षता घेतल्यास कोरोनापासून दूर राहाता येते. तसेच कोरोना झाल्यास तो योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे कुठेही पॅनिक निर्माण होऊ नये. सर्वांनी काटेकोरपणे दक्षता पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews