अमृत योजनेंतर्गत अमरावतीसाठी मुबलक पेयजल उपलब्ध होणार पालकमंत्री ॲड. यशोमतीताई ठाकूर व आमदार सुलभाताई खोडके यांच्या पाठपुराव्याला यश

अमरावती, दि. 23 : अमृत योजनेंतर्गत राजुरा जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णत्वास आले असून, लवकरच अमरावतीकरांना मुबलक शुद्ध पेयजल उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

            शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून अमृत योजनेत अमरावती शहर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. शंभर कोटींहून अधिक निधीतून हा प्रकल्प आकारास आला असून, त्याद्वारे अमरावतीकरांना शुद्ध व मुबलक पेयजल नियमित मिळणार आहे.  अमृत योजनेत केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्यातून हा प्रकल्प आकारास आला असून, शहरात जलशुद्धीकरण केंद्राबरोबरच पाण्याच्या पाच टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर  व अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन निधी उपलब्धतेची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हे काम वेगाने पूर्ण होत आहे.

                                  जिल्ह्यातील इतर पाणीपुरवठा योजनांनाही वेग :श्रीमती ठाकूर

            अमरावती शहराबरोबरच जिल्ह्यातील इतर पाणीपुरवठा योजनांच्या कामांनाही वेग देण्यात आला आहे. त्याचबरोबर, ग्रामीण भागातील  अनेक पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जात असून, उर्वरित योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.

                         

   मुबलक व शुद्ध पाणी मिळेल : श्रीमती खोडके

 पाणीपुरवठ्यासाठी तपोवनानजिक राजुरा येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. पाण्याच्या टाक्यांचेही काम पूर्णत्वास गेले आहे. याद्वारे शहराला सुमारे 65 लक्ष लीटर पाणीपुरवठा होणार आहे. अमरावतीकरांना आता शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील, अशी माहिती आमदार सुलभाताई खोडके यांनी दिली.

 शहराच्या वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पाण्याची उणीव भासू नये, यासाठी अमृत योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प साकार होत आहे.  अमरावती शहरातील सर्व परिसर, बडनेरा, शहरात नव्याने निर्माण झालेल्या वस्त्या येथेही सर्व नागरिकांना शुद्ध स्वच्छ पिण्याचे व वापराचे पाणी मुबलक प्रमाणात  पुरेसा पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या योजनेचा सर्वांना लाभ मिळेल, असा विश्वास आमदार श्रीमती खोडके यांनी व्यक्त केला.
Previous Post Next Post
MahaClickNews