जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाव्दारे योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन _वयोवृध्द तसेच बालकांचा योग प्रशिक्षणात उर्त्स्फुत सहभाग

अमरावती, दि. 20 : कोरोना महामारीच्या संकटकाळात नित्य योगासन केल्यामुळे मनुष्याच्या जीवनशैलीत बदल घडून निरोगी जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्‍य विभागाव्दारे जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये योग प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. नागरिकांसाठी योग प्रशिक्षण नि;शुल्क असून या उपक्रमाचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे. योग फक्त योगासनापुरताच मर्यादीत नसून योगसनाच्या माध्यमातून मन, शरीर व श्वासच्छोवास आदीचे संतुलन राखले जावून मनुष्याचा जीवनप्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो, असेही त्यांनी सांगितले.

               योगचे मोठ्या प्रमाणात फायदे आहेत. योग व्यक्तीला स्वास्थवर्धक बनवून शरीरात उर्जा निर्माण करते. योग मेंदु व विचारांना प्रभावित करतो. योगमुळे नकारात्मक विचार कमी होऊन ताण-तनाव, चिंता कमी होण्यासाठी मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह सुरळित होण्यास मदत होऊन शरिराचे तापमान नियंत्रित ठेवल्या जाते. संपूर्ण ऑक्सीजनचा पुरवठा व पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. वजन कमी व नियंत्रित करण्यास योगाचा फायदा होतो. शरीरातील काही विषद्रव्ये बाहेर फेकण्यास मदत होते. अस्वस्थ मन नियंत्रित करण्यासाठी फायदा होतो. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होण्यास मदत होते. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्याने स्नायु बळकट होतात. आपल्यातील सजगता वाढल्याने मनाचे लक्षण मनुष्याला सहज लक्षात येते आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताणतणावातून मुक्त होऊन मनाला शांत करु शकतो. शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते.अंर्तज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगमुळे प्राप्त होते.

               जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रास योग प्रशिक्षणाचे आयोजन होत असून त्याठिकाणी नियुक्त योग प्रशिक्षक दिवसाला दोन सत्रात योग शिबिर घेतात. आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये पुरुष व महिला, बालक, ज्येष्ठ आदी लाभार्थी या शिबिरात सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास ग्रामीण भागातील नागरिकांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. जनतेने त्यांचे स्वस्थ राहण्यासाठी तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्याच्यादृष्टीने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

                  सध्या कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी कोरोना त्रिसुत्रीचा काटेकोर पालन करुन प्रशिक्षण द्यावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे व माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत प्रशिक्षकांचे व प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post
MahaClickNews