अमरावती, दि. 9 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
मंडळाकडून आता विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप, ऑनलाईन नोंदणी आदी कामे होत आहेत. मास्कचा वापर करणा-यांनाच प्रवेश द्यावा. सामाजिक अंतर राखले जाईल, याची दक्षता घ्यावी. सॅनिटायझर, ऑक्सिमीटर व टेंम्परेचर गनचा वापर व्हावा. स्त्री व पुरुष कामगारांसाठी स्वतंत्र रांगा असाव्यात. सामाजिक अंतर राखण्यासाठी परिसरात वर्तुळे आखली आहेत. त्यांचा रांगेसाठी वापर व्हावा. विविध कल्याणकारी योजनांचे फलक ठळकपणे लावावेत. सुरक्षाकीट वाटप जिथे सुरु आहे, तिथे संबंधितांचे नाव, पत्ता व वाटपाची वेळ असा फलक दर्शनी भागात लावावा. सुरक्षासंच व अत्यावश्यक संच हे कार्यालयानजिकच्या अंतरावर व्हावे. जिल्ह्यातील सेतू कार्यालय किंवा सीएससी सेंटर, संगणककेंद्रधारकांनी बांधकाम मजुरांना ऑनलाईन कामकाज करण्यासाठी विहित शुल्क आकारावे. अधिकाधिक कामगार बांधवांची नोंदणी व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.
यावेळी कामगार उपायुक्त अनिल कुटे व इतर अधिकारी उपस्थित होते.