ब्रेक द चेन'अंतर्गत लावलेले निर्बंध शिथिल करावेत पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अमरावती, दि. ६ : अमरावती जिल्ह्यातील पूर्वीचे लॉकडाऊन व त्यानंतर रुग्णसंख्येत घट पाहता आता 'ब्रेक द चेन'अंतर्गत लावलेले निर्बंध शिथिल करावेत, असे निवेदन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

कोरोनाबाधितांची त्यावेळची वाढती संख्या पाहून अमरावती जिल्ह्यात यापूर्वीच लॉकडाऊन लागू होते. त्यानंतर बाधितांच्या संख्येत घट झाल्याने निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. आता राज्य  शासनाकडून ब्रेक द चेन अंतर्गत पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. तथापि, अमरावतीत यापूर्वीचे लॉकडाऊन व रुग्णसंख्येत झालेली घट पाहता नव्या अधिसूचनेचा पुनर्विचार  करणे आवश्यक वाटते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत व व्यापारी बांधवांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे निवेदनात नमूद आहे.

जिल्ह्यात २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान रुग्णसंख्या ६०० ते ८०० होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले. साथ लक्षात घेऊन व्यापारी बांधव व नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे मार्च व एप्रिलमध्ये ही संख्या रोडावत जाऊन अडीचशेपर्यंत घटली. २३ फेब्रुवारीला ३७.५ वर असलेला पॉझिटिव्हीटी रेट ५ एप्रिलला ११.३ पर्यंत घटला आहे. दरम्यान, गरज लक्षात घेऊन हळूहळू विविध व्यवसायाना परवानगी देण्यात आली. तत्पूर्वी चाचणी बंधनकारक असल्याने त्यालाही व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. निकषानुसार लसीकरणही गतीने होत आहे.

मागच्या महिन्यातील लॉकडाऊनला व्यापारी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आता हळूहळू येथील स्थिती सुधारून लॉकडाऊन खुले होत असतानाच पुन्हा नवे निर्बंध आल्याने व्यापारी व नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद राहून नुकसान होत आहे. त्यामुळे
अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत व व्यापारी बांधवांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदयांना केली आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews