जुने खत पूर्वीच्याच दराने विकावे; अन्यथा कारवाई जिल्हा कृषी अधिक्षक अधिका-यांचा खतविक्रेत्यांना इशारा

अमरावती, दि. 22 : काही खत उत्पादक कंपन्यांनी खताची दरवाढ केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. विक्रेत्यांनी जुना शिल्लक खत साठा पूर्वीच्याच एमआरपीप्रमाणे विकणे बंधनकारक असून, खत विक्रेत्यांनी तो नियम पाळलाच पाहिजे. कुठेही चढ्या दराने जुन्या खताची विक्री होत असेल तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी खत विक्रेत्यांना दिला आहे.

खत पुरवठा करणा-या कंपन्यांचे दर ग्रेडनिहाय वेगवेगळे आहेत. विक्रेत्यांकडे जुना व नवीन दोन्ही प्रकारचा साठा आहे. जुना साठा पूर्वीच्या दराने विकणे बंधनकारक आहे, असे श्री. चवाळे यांनी स्पष्ट केले.

 *शेतक-यांनी ई-पॉस मशीनवरील बिलाचा आग्रह धरावा*

शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची खरेदी करताना विक्रेत्याकडे ई-पॉस मशीनवरील बिलाचा आग्रह करावा कारण त्यावर जुन्या साठ्याचे दर जुन्या दराप्रमाणेच येतात. खरेदी केलेल्या खताची पक्की पावती घ्यावी. तसेच खरेदी केलेल्या पोत्यावरील खताची एमआरपी व विक्रेत्याने दिलेले ई- पॉस पक्के बिल तपासून घ्यावे. यासंबंधी काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिका-यांशी किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही श्री. चवाळे यांनी केले.
Previous Post Next Post
MahaClickNews