माझे आरोग्य- माझी जबाबदारी सर्वांनी ‘स्टीम सप्ताह’ पाळून साथ नियंत्रणासाठी सहकार्य करावे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे अत्यंत आवश्यक : पालकमंत्री 


अमरावती, दि. 23 : _मास्कचा वापर, हातांची स्वच्छता व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीपालनाबरोबरच नागरिकांनी स्वत:च्या आरोग्य संरक्षणासाठी नियमित वाफ, चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. याबाबत भरीव जनजागृतीसाठी जिल्ह्यात ‘माझे आरोग्य- माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सोमवारपासून ‘स्टीम सप्ताह’ राबविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वत:च्या आरोग्य संरक्षणासाठी  ‘स्टीम सप्ताह’ पाळण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले._


            कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप,

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह , पोलीस अधिक्षक हरी बालाजी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉ. वसंत लुंगे, डॉ. अनिल रोहणकर, हरीभाऊ मोहोड, डॉ. दिनेश ठाकरे, डॉ. संदीप दानखडे आदी उपस्थित होते.  साथीचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉलबरोबरच स्वच्छता व वाफ घेण्यासारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे, अशी बाब आरोग्यतज्ज्ञांनी या बैठकीत मांडली. त्यानुसार पुढील संपूर्ण सप्ताह स्टीम सप्ताह म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.   


                                                *प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे अत्यंत आवश्यक : पालकमंत्री*


            ज्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत, त्यात स्वत:ची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाच्या दुस-या टप्प्यातील परिस्थिती पाहता ही बाब प्रकर्षाने पाळली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने बाहेरून आल्यावर हातांची व शरीराच्या स्वच्छतेसह नियमित वाफ घेतली पाहिजे. सर्व नागरिकांनी हा स्टीम सप्ताह पाळावा व आपल्या आरोग्याप्रती असलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केले.  जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गरज पडल्यास जिल्ह्यात 1 हजार खाटांच्या व्यवस्थेचे नियोजन आहे. कोरोना उपचारात आवश्यक ऑक्सिजन, रेमडिसिविर आदी बाबींच्या पुरेशा पुरवठ्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. गरजूंना त्याची उणीव भासू नये यासाठी युद्धस्तरावर यंत्रणा राबविण्यात येत आहे. वरुड येथील आयटीआय येथे नवीन कोविड केअर सेंटर व मोर्शी येथील सेंटरमध्ये 20 खाटा वाढविण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.


 *विविध मान्यवरांनी केले आवाहन*


            स्वयंरक्षणासाठी कोरोना प्रोटोकॉल पाळत असतानाच कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे, चांगला आहार व सकारात्मक विचार यांचा अवलंब होणे आवश्यक आहे. त्यामुळे अमरावती जिल्हावासियांनी स्टीम सप्ताह पाळण्याचे आवाहन विविध मान्यवरांनी केले.


                                    अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी सर्वप्रकारचे उपाय अंमलात आणलेच पाहिजे. एकदा सकाळी व नंतर झोपण्यापूर्वी नियमित वाफ घेतली पाहिजे. संचारबंदीत सर्वांनी घरी राहावे व कोरोना प्रोटोकॉल पाळून कोरोना महामारीवर मात करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार श्रीमती खोडके यांनी केले.  


                        संपूर्ण जिल्ह्यात स्टीम सप्ताह पाळण्यात येत आहे. वाफा-याबाबत आरोग्यतज्ज्ञांकडून नेहमीच सूचित केले जाते. त्याचे पालन व्हावे, असे आवाहन श्री. वानखडे यांनी केले. कोरोनाच्या साथीचे समूळ उच्चाटन होण्यासाठी नियमित वाफ घेणे उपयुक्त ठरेल. मला स्वत:ला या बाबीचा फायदा झाला आहे व मी ती नियमित पाळतो, असे माजी आमदार श्री. जगताप यांनी सांगितले.


 आजार असो की नसो, नियमित वाफ घेतली पाहिजे. वाफ घेण्यासाठी मेडिकल इक्विपमेंटच पाहिजे, असे काही नाही. साध्या भांड्यात गरम पाणी घेऊन डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ घेता येते. बाहेरून घरी आल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा व स्टीम घ्यावी. दिवसातून दोन किंवा तीनदा वाफ घ्यावी. त्याचा निश्चितच उपयोग होतो, असे आवाहन डॉ. लुंगे यांनी केले.


            दक्षता त्रिसूत्रीबरोबरच दिवसातून दोन वेळा वाफ व गरम पाण्याने गुळण्या केल्यास त्याचा निश्चित लाभ मिळतो, असे आवाहन डॉ. रोहणकर यांनी केले.

Previous Post Next Post
MahaClickNews