कोविड सेंटरमध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी शासनाकडून सूचना

सर्व कोविड रुग्णालयांनी पालन करण्याबाबत जिल्हाधिका-यांचे निर्देश

अमरावती, दि. 6 : कोविड रुग्णालये, हेल्थ सेंटर, केअर सेंटर आदी ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनेत मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. त्याचे सर्व कोविड रुग्णालये व केंद्रांनी पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

कोविड रुग्णालयात लैंगिक अत्याचाराच्या घटना राज्यात काही ठिकाणी घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार शासनाने या रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार स्त्री रुग्ण व पुरुष रुग्णांना स्वतंत्र कक्षात दाखल करावे. स्त्री रुग्णाची तपासणी महिला डॉक्टरने करावी व महिला डॉक्टर नसेल तर पुरुष डॉक्टरने स्टाफ नर्सच्या उपस्थितीत करावी. स्त्री रुग्ण कक्षात दोन किंवा जादा महिला रुग्ण ठेवावेत जेणेकरून त्यांचे मनोबल व सुरक्षिततेची भावना वाढेल. स्त्री रुग्ण कक्षात स्त्री सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. तिथे स्त्री स्वच्छतासेवक व स्त्री परिचर असावी. स्त्री रुग्णांना गावाबाहेरील सेंटर्समध्ये न ठेवता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कोविड सेंटर्समध्ये दाखल करावे. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही सुस्थितीत चालू असावेत जेणेकरून ये-जा करणा-यांवर देखरेख करता येईल. स्त्री रूग्णांना मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी. त्यांच्या नातेवाईकांना दररोज 1-2 वेळा संपर्क साधण्यास कळवावे. कोणत्याही परिस्थितीत पुरुष डॉक्टरने अधिपारिचारिका किंवा स्त्री परिचर यांच्या उपस्थितीतच स्त्री रुग्णांची तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Previous Post Next Post
MahaClickNews