पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘टीएचओं’ची बैठक ग्रामीण आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कामे करावीत पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 दि. 27  : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेड, उपचार साधनसामग्री याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात साथीचे वेळीच नियंत्रण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कामे करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.  

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिका-यांची पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपद्वारे बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून कामे करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण तपासणी व जनजागृतीसाठी गावोगाव विविध सर्वेक्षणे घेतली. त्यानुसार संपर्क व सर्वेक्षणात नियमितता ठेवावी. कंट्रोलरुमद्वारे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे यांच्याशी समन्वय ठेवावा. उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्री यंत्रणा सातत्याने कार्यान्वित असण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. आवश्यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी प्रशासनाशी सतत समन्वय ठेवावा.   

  *वेळीच औषधोपचार आवश्यक*

व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवताच ‘प्रिव्हेंटिव्ह’ औषधोपचार वेळीच सुरु करावे जेणेकरून आजारावर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य होईल. याबाबत आरोग्यतज्ज्ञांनीही यापूर्वीच सूचित केले आहे. आपण स्वत: याबाबत बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना परिपत्रकाद्वारे सूचना द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपचार सुविधा, तसेच लसीकरण आदी बाबींचे सनियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने प्रत्येक बाब वेळोवेळी तपासून त्यानुसार कार्यवाही करावी व जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा. प्रत्येक तालुक्यांत लसीकरण केंद्रे सुरु आहेत. या कामातही नियमितता ठेवावी. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी टोकन सिस्टीम राबविण्यात यावी जेणेकरून गर्दीही टळेल व नागरिकांचाही वेळ वाचेल, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोना प्रतिबंधासाठी आपण गेले वर्षभर लढत आहोत. आरोग्य क्षेत्रातील सर्वांनी आघाडीवर राहून जीवाची पर्वा न करता काम केले आहे. रुग्णसेवेहून मोठे कार्य नाही. आतापर्यंत सर्वांनी मिळून चांगले काम केले आहे, यापुढेही करूया, त्यासाठी सर्वांनी दक्षता बाळगूया, असेही आवाहनही त्यांनी केले.
Previous Post Next Post
MahaClickNews