सोयाबीन उगवण तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये गुणवत्तापूर्ण बियाण्याचा पुरवठा व्हावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम नियोजन बैठक


अमरावती, दि. 23 : गत हंगामात सोयाबीनच्या उगवणबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजनेची भरीव अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

खरीप हंगाम नियोजनाबाबत कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, हरीभाऊ मोहोड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, खरीपासाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याचा पुरेसा पुरवठा सर्वदूर झाला पाहिजे. त्याअनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत.  मागील वर्षी अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्यात बियाण्याची गुणवत्ता कमी झाल्याने पुन्हा पेरणीची वेळ आली. हे पुन्हा घडू नये. त्यासाठी आताच उपाय राबवावेत. जिल्ह्यात कुठेही बियाण्याची कमतरता भासू नये, तसेच कुठेही बियाण्याची साठेबाजी होता कामा नये. असा प्रकार कुठेही झाल्याचे आढळल्यास कुणाचीही गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

            जिल्ह्यात आगामी खरीपासाठी सोयाबीन पिकाखाली 2 लक्ष 70 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, 2 लक्ष 15 हजार क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यानुसार महाबीजकडे 85 हजार क्विंटल व खासगी कंपन्यांकडे 45 हजार 316 क्विंटल मागणी करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांना घरचे बियाणे जतन करण्याबाबत आवाहन करण्यात येत असून, त्यानुसार 92 हजार 805 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, अशी माहिती श्री. तोटावार यांनी दिली.

                        सोयाबीनचे बियाणे नाजुक असल्याने त्याची साठवणूक व वाहतूक योग्य होणे, बियाण्याची विक्रेतास्तरावर तपासणी होणे आदी सूचना कृषी आयुक्तांकडून प्राप्त होत्या. त्यानुसार तालुकास्तरीय विक्रेत्यांची ऑनलाईन सभा घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी सेवा केंद्रधारकांनी बियाण्याचे डिलिव्हरी चलन, बॅगवरील लॉट नंबर, सत्यतादर्शक बियाण्याबाबत स्टेटमेंट 1 व 2 व प्रमाणित बियाण्याबाबत रिलीज ऑर्डर तपासणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

बियाण्याची उपलब्धता, उगवणक्षमता तपासणी, त्यासंबंधीची व्यवहार्यता व उपयुक्तता आदींबाबत सर्वंकष विचार करून कार्यवाही व्हावी. आगामी खरीपाचा हंगाम लक्षात तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

शेतकरी बांधवांनीही बियाण्याची उगवणक्षमता तपासून ती 70 टक्के असल्याची खात्री करून पेरणी करावी. घरचे सोयाबीन बियाणेही तपासूनच पेरावे. सोयाबीन बियाणे पेरताना चार सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर पेरू नये. ट्रॅक्टरने पेरायचे झाल्यास अनुभवी ड्रायव्हरकडून पेरणी करावी. बियाणे बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये. बीजप्रक्रियेसाठी बुरशीनाशक किंवा जीवाणू संघ वापरावा, आदी विविध सूचना कृषी कार्यालयाने केल्या आहेत.
Previous Post Next Post
MahaClickNews