सायन्सकोर मैदानात विविध सुविधांची भर ऐतिहासिक ठेव्याचे जतन, पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. ३ : _जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता असून, कौंडण्यपूर, चिखलदरा, लासूरसारख्या प्राचीन, पौराणिक स्थळांबरोबरच ऐतिहासिक स्थळांचेही जतन, संवर्धनाचे काम शासनाने हाती घेतले आहे. अमरावती शहरातील  सायन्सकोर मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे कामही लवकरच पूर्णत्वास जाईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज  सांगितले._
जिल्ह्यात विविध पौराणिक, ऐतिहासिक व निसर्गसुंदर स्थळांत विविध सुविधांची भर घालून त्यांचे जतन व संवर्धनासाठी शासनाकडून, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेकविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
               

 जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जिल्ह्यातील संत व महापुरुषांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यायासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्प, चिखलदरा येथे अनेकविध कलाकृतींतून सौंदर्यीकरण अशी कितीतरी कामे आकारास येत आहेत. त्याचअंतर्गत ऐतिहासिक सायन्सकोर मैदानाचे जतन व सौंदर्यीकरणाचे कामही होत आहे. अमरावती ही संत, महापुरुषांची भूमी आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपला जावा, शहराच्या, जिल्ह्यातील सुविधांमध्ये, सौंदर्यात भर पडावी यासाठी अनेक कामे होत आहेत. त्यासाठी निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी दिली.

सुमारे १ कोटी २० लक्ष रुपये निधीतून सायन्सकोर मैदानावर विविध सुविधांची निर्मिती होत आहे.मैदानाला कुंपण भिंत व मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाने वेग घेतला आहे. मैदानाचे समतलीकरण करण्यात आले असून, वाकिंग ट्रॅकचेही काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती उपअभियंता विशाल मुंडाणे यांनी दिली.

सायन्सकोर मैदान हे मोठे क्षेत्रफळ असलेले विशाल व शहरातील मध्यवर्ती मैदान आहे. विविध सुविधांच्या उभारणीमुळे सौंदर्यात भर तर पडेलच, शिवाय ट्रॅक उभारल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळेल. त्याचप्रमाणे, कुंपण भिंतीमुळे सुरक्षितता जपली जाणार आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews