सिंचन प्रकल्पांच्या कामांना मिळणार गती जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 7 : अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच प्राप्त होणार असून, त्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्याचप्रमाणे, कामे पूर्ण झालेले प्रकल्प लवकरच कार्यान्वित होऊन जिल्ह्यातील सिंचनक्षमतेत भर पडणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

          जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता वेळेत प्राप्त होण्याबाबत निवेदन केले. त्याचप्रमाणे, पालकमंत्र्यांनी त्याबाबत जलसंपदा मंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटूनही चर्चा केली. आमदार बळवंतराव वानखडे यावेळी उपस्थित होते.

 या सर्व मान्यता वेळेत प्राप्त होतील व सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली जाईल, असे जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी आश्वासित केले आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील पूर्ण झालेले सिंचन प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील कृषी सिंचनक्षमतेत भर पडणार आहे, तसेच कृषी उत्पादकताही वाढीस लागेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पाथरगांव , चंद्रभागा, गुरुकुंज उपसा सिंचन , लोअर वर्धा, बोर नदी प्रकल्प, चांदस वाठोडा , चारघड , गडगा मध्यम प्रकल्प , पंढरी मध्यम प्रकल्प आदी विविध प्रकल्पांबाबत यावेळी सखोल चर्चा झाली. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत येणा-या  अठरा प्रकल्पांचे कामही वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त होणार असल्याने कामे मार्गी लागतील. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. सिंचनक्षमता वाढून कृषी उत्पादकतेत भर पडावी व शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

 पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews