टंचाई आराखड्यात प्रस्तावित कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 30 : उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असावी यासाठी प्रस्तावित व मंजूर कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

 पाणी टंचाई आराखड्यानुसार 797 गावांत 852 उपाययोजनांसाठी  797 गावांसाठी 13 कोटी 15 लक्ष रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. 159 गावांतील 163 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत टँकरने होणा-या पाणीपुरवठ्यात चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, आकी, सोमारखेडा, मलकापूर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुरे या सहा गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात 29 गावांत 15 विंधनविहीरी व 18 खासगी विहीरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 3, भातकुली तालुक्यात 1, मोर्शी तालुक्यात विंधनविहीरी व खासगी विहिरी मिळून सहा, वरुड तालुक्यात एक, चांदूर रेल्वे तालुक्यात 7, अचलपूर तालुक्यात 8 बोअरवेल व एक खासगी विहीर, चिखलदरा तालुक्यात 6 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

 टंचाई आराखड्यात विंधनविहीर, कुपनलिका घेणे, नळयोजनांची, विंधनविहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, खासगी विहिर अधिग्रहण व प्रगतीपथावरील 36 नळयोजना पूर्ण करणे असा 797 गावांसाठी 13 कोटी 15 लक्ष रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्यातील 163 उपाययोजनांसाठी 5 कोटी 90 लक्ष निधी मंजूर आहे. सद्य:स्थितीत 94 गावांत उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी 2 कोटी 3 लक्ष खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची 72 कामे प्रस्तावित असून त्यासाठी 1 कोटी 87 लाख रूपये, तर मंजूर 65 कामांसाठी 3 कोटी 78 लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews