प्रत्येक संकटाचा बिमोड करून महाराष्ट्र प्रगतीकडे दमदार वाटचाल करेल*- *पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १ : संकटाने डगमगून न जाता त्याचा धीरोदात्तपणे सामना करत बिमोड करणे हा महाराष्ट्राचा कायम स्वभाव राहिला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी  कोरोना संकटावरही विजय मिळवून महाराष्ट्र प्रगतीकडे दमदार वाटचाल करेल, असा विश्वास राज्याच्या  महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र दिन तथा राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त  पालकमंत्री ऍड.  ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण आज विभागीय आयुक्त कार्यालयात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने  वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी  जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्रदिन व कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.

         _पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाची जागतिक आपत्ती येऊनही महाराष्ट्र स्थिर राहिला, परिस्थितीशी लढत राहिला आणि आताही लढत आहे. प्रत्येक अडचणीवर मात करण्यात येत आहे. हे सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. गेले वर्षभर प्रशासन न थकता अहोरात्र कार्यरत आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, नोकरदार आणि नागरिक सारेच एकजुटीने काम करत आहेत. कुठल्याही संकटांनी डगमगून न जाता महाराष्ट्रभूमीच्या प्रगतीची पुनर्आखणी करण्याचा व त्या दिशेने दमदार वाटचाल करण्याचा आमचा निर्धार आहे. सर्वधर्म, जाती, पंथ, विचारांच्या समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे._


 पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प शासनाने हाती घेतले, त्यातील काही पूर्णत्वासही गेले व अनेक आकारास येत आहेत.  गतवर्षी अत्यंत कमी वेळेत जिल्हा कोविड रुग्णालय, तालुका कोविड रूग्णालय व हेल्थ सेंटर, तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व पीडीएमसी येथे लॅब उभारण्यात आली. तेवढ्यावरच न थांबता दूरदृष्टी ठेवून ऑक्सिजन प्लान्टचेही नियोजन करण्यात आले. त्यामुळे विभागीय संदर्भ रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, अचलपूर व धारणीचे उपजिल्हा व तिवसा, नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सुरु झाले आहे. तिथे वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू निर्माण होऊन गरजू रुग्णांसाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबरच अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या 200 खाटांच्या अतिरिक्त रुग्णालयाच्या बांधकामासाठीही 6 कोटी 86 लाख इतका निधी मिळवून देण्यात आला आहे. अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रूग्णालयासाठीही निधी प्राप्त झाला आहे. अमरावती हे सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा असणारे मध्यभारतातील महत्वाचे केंद्र व्हावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, आता संपूर्ण लसीकरणाचीही तयारी शासनाने सुरु केली आहे. फ्रंटलाईन वर्कर्स व 45 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांपाठोपाठ आता 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस देण्यात येत असून, आज महाराष्ट्र दिनी त्याची सुरुवात होत आहे. _नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यासाठी साडेसहा हजार कोटींची तरतूद शासनाने केली आहे._

*अनुसूचित जमातींसाठी खावटी अनुदान योजनेचा आज शुभारंभ होत आहे. आदिवासी बांधवांना धान्य व गरजेच्या वस्तू मिळवून देण्यासाठी या योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.* गेल्या वर्षी सुरु झालेली शिवभोजन योजना कोरोनाकाळात गरीब व गरजू जनतेसाठी आधार ठरत आहे. त्याचबरोबर साथ लक्षात घेऊन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे.  
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या गावात रोजगार मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत.  आता पुढील वर्षासाठी ‘मनरेगा’तून भरीव रोजगारनिर्मितीसाठी 4 हजार 393 कोटीचा कृती आराखडा व लेबर बजेट तयार केले आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत अडीचपट असून, मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. आता केवळ रोजगारनिर्मिती एवढेच उद्दिष्ट न ठेवता त्याद्वारे ग्रामसमृद्धीकडे पाऊल टाकण्यात येत आहे. शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजनांचा मेळ घालणे व गावातील अंगणवाडी, शाळा, पाणलोट क्षेत्रे आदींचा विकास करणे यासाठी ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात त्याच्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews