कोरोनाकाळात ८६४ रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेद्वारा दृष्टीलाभसामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाची कामगिरी

_अमरावती, दि. ७ :  महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लागू आहे. अशा विपरीत परिस्थितीत जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागाने कोरोनाविषयक आवश्यक काळजी घेत तब्बल ८६४ मोतीबिंदू व तीन काचबिंदू नेत्ररुग्णांवर यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करुन गोरगरीब रुग्णांना दृष्टी मिळवून दिली आहे._

             जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लागू असल्याने सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया बंद झाल्या होत्या. परंतू अशा संकटकाळातही सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाने अनेक अडचणींचा सामना करत कोरोनाविषयक आवश्यक ती काळजी घेऊन अंध रुग्णांना सेवा दिली आहे. या काळात नियमितपणे अंध, नेत्ररुग्णांना बडनेरा येथील नेत्र रुग्णालयात पोहोचवून त्यांच्यावर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्याचे काम पार पाडले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील 864 मोतीबिंदू व तीन काचबिंदू नेत्ररुग्णांवर यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करुन गोरगरीब अंधांना दृष्टी मिळवून दिली आहे.

               जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शन, प्रयत्न व पाठपुराव्याने आता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र युनिट पुन्हा कार्यरत झाले आहे. अचलपूर येथे नेत्रशिबिर आयोजित करण्यात आले. त्यात एकूण 81 शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यात मेळघाटातील दुर्गम भागातील अनेक रूग्णांना लाभ मिळाला.

               सन 2021-22 मध्ये माहे एप्रिल अखेर 152 नेत्र शस्त्रक्रिया पार पाडल्या. जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती अंतर्गत दृष्टीदोष असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना व नेत्रशस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. रुग्णांची ने-आण करण्याकरीता जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक नवीन दिव्यांग वाहिनी नेत्रविभागाला उपलब्ध करून दिली. या काळात ॲटोक्लेव मशीनच्या कार्यक्षमतेबाबत किंवा कधी नेत्रशस्त्रक्रिया औषधी साहित्य सामुग्रीच्या कमतरतेबाबत अडचणी उभ्या राहिल्या. मात्र, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी वेळीच उपाययोजनेला गती दिली. वेळोवेळी आलेल्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर, जिल्हाधिकारी श्री. नवाल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निकम यांनी सातत्याने प्रयत्न करून अडचणींचे निराकरण केले. नेत्र विभागानेही कोरोनाकाळात न थांबता रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून अविरतपणे आरोग्य सेवा बजावली.

               शारिरीक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील सर्व जनतेसाठी आरोग्य सेवा खुली आहे. अंध असलेल्या गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा व मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेत्र तपासणी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निकम व नेत्रतज्ज्ञ आणि जिल्हांतर्गत आरोग्य संस्थमध्ये कार्यरत सर्व नेत्रचिकित्सा अधिकारी यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews