म्युकरमायकोसिस निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. २३ : _म्युकरमायकोसिसच्या  निदानासाठी आवश्यक चाचण्यांचे वाजवी दर अमरावती जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहेत. चाचणी दराची कमाल मर्यादा निश्चित केल्याने लक्षणे किंवा शंका असणाऱ्यांना निश्चित  दरात चाचणी करून घेता येणार आहे._

जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधा उपलब्ध करून देतानाच चाचणी दरही आटोक्यात राहावेत व रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, म्युकर मायकोसिस चाचणी दर नियंत्रणाचा निर्णय राज्यात प्रथमतः अमरावती जिल्ह्यात होत आहे.

जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सभा झाली. त्यात रेडिओलॉजी संघटना, ईएनटी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.

*एमआरआय विथ कॉन्ट्रास्ट चाचणी निदानासाठी आवश्यक*

'एमआरआय विथ कॉन्ट्रास्ट' ही चाचणी काळी बुरशी आजाराच्या निदानासाठी आवश्यक असून, 'सिटी' व 'सिटी स्कॅन विथ कॉन्ट्रास्ट' चाचण्याही आवश्यकतेनुसार केल्या जातात.
त्यानुसार या चाचण्यांची कमाल दर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 'स्पेसिफिकेशन ऑफ एमआरआय पीएनएस ऑर्बिट अँड ब्रेन विथ गॅलोनिनियम कॉन्ट्रास्ट' या चाचणीसाठी ७ हजार रुपये,
'स्पेसिफिकेशन ऑफ सिटी स्कॅन विथ कॉन्ट्रास्ट' या चाचणीसाठी ५ हजार रुपये, तर 'स्पेसिफिकेशन ऑफ सिटी स्कॅन विदाऊट कॉन्ट्रास्ट' या चाचणीसाठी ३ हजार रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
या रकमेत एमआरआय, सिटी स्कॅन तपासणी, सिटी फिल्म, पीपीई किट, डिसइन्फेक्टेड सॅनिटायझेशन दर व जीएसटीचा समावेश आहे. तसेच 'विथ कॉन्ट्रास्ट'मध्ये 'कॉन्ट्रास्ट मीडिया' व ते देण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था याचा समावेश आहे.

*'प्रिस्क्रिप्शन'विना चाचणी नाही*

एमआरआय, सिटी स्कॅन  नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे दर लागू राहतील. हा आदेश लागू होण्यापूर्वी जर कुठल्याही रुग्णालय किंवा तपासणी केंद्रात याहून कमी दर असतील तर मूळ कमी दरच लागू राहतील. चाचणी अहवालात चाचणी कोणत्या यंत्राद्वारे केली ते नमूद असणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय चाचणी करू नये. चाचणी अहवाल सुस्पष्ट व आवश्यक तपशिलासह असावा याची खबरदारी रेडिओलॉजिस्टने घ्यावी. एखाद्या रुग्णाकडे आरोग्य विमा असेल किंवा एखाद्या रुग्णालयाने तपासणी केंद्राशी करार केला असेल तर हे दर लागू राहणार नाहीत. निश्चित केलेल्या दराचा फलक रुग्णालय किंवा तपासणी केंद्रात दर्शनी भागात लावावा. निश्चित दरांहून अधिक रक्कम आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अशी कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी राहतील.
Previous Post Next Post
MahaClickNews