कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद लवकरच योजना अंमलात येणार- महिला व बाल विकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २८ : कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद करण्याबाबत सकारात्मक चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी करण्यात आली असून, कॅबिनेटपुढे हा विषय ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

 महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेत महिला बाल विकास विभाग करत असलेल्या कामांची माहिती दिली. कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे ५ लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळत रहावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे, एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा २५०० /- रुपये मदत मंजूर करावी, अशीही मागणी महिला व बालविकास मंत्र्यांनी  केली. या  मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली असून, लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी ही तरतूद महत्वपूर्ण ठरणार आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews