_विहित भाडेदरपत्रक रुग्णवाहिकेच्या आत लावणे बंधनकारक आकारलेल्या भाड्याबद्दल रुग्णासोबतच्या व्यक्तीची सही आवश्यक जिल्ह्यात रुग्णवाहिकेचे दर निश्चित जादा दर आकारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व फौजदारी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


अमरावती, दि. १८ : _जिल्ह्यात कोविड साथ पाहता रुग्णवाहिकांची मागणी वाढली असून, रुग्णवाहिकाधारकाकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून रुग्णवाहिकेचे अधिकृत दर जाहीर करण्यात आले असून, त्यापेक्षा अधिक दर आकारल्यास रुग्णवाहिकाधारकावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे._

कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका रास्त दरात उपलब्ध असावी यासाठी प्राधिकरणाकडून दर निश्चित करण्यात आले. प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री. नवाल, सहायक वाहतूक पोलीस आयुक्त किशोर सूर्यवंशी व सदस्य सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गित्ते यांच्या समितीने हा निर्णय घेतला.

रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार भाडे दर निश्चित करण्यात आला आहे. मारुती व्हॅन रुग्णवाहिकेसाठी प्रथम २५ किलोमीटरसाठी ८०० रुपये व त्यापुढील प्रत्येक किमीसाठी १५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. टाटा सुमो व मॅटेडोरसदृश वाहिकेसाठी प्रथम २५ किमीसाठी ९०० रुपये व त्यापुढे प्रति किमी १५ रुपये दर राहील. टाटा ४०७ स्वराज माझदा आदी वाहनांत बांधणी केलेल्या रुग्णवाहिकेचे दर प्रथम २५ किमीसाठी बाराशे रुपये व त्यापुढे प्रति किमी १८ रुपये असे निश्चित करण्यात आले आहेत. यात डॉक्टर फी अंतर्भूत नाही. विहित भाडेदरपत्रक रुग्णवाहिकेच्या आत लावणे बंधनकारक मालक किंवा चालकावर बंधनकारक आहे.

*वाहनात रजिस्टर ठेवा*

वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक असून, त्यात रुग्णांचे नाव, पत्ता, तारीख, आकारलेले भाडे व रुग्णासोबतच्या व्यक्तीची नाव, पत्ता व सही असणे आवश्यक आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या सुरक्षित व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मालकाची असेल. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या भाड्यात चालकाचा पगार व इंधन   खर्च समाविष्ट आहे.

     *दंडाची तरतूद*

जादा दर आकारणाऱ्या वाहनधारकावर प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्यासाठी २० हजार रुपये दंड व तिसऱ्या गुन्ह्यासाठी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

तसे आढळल्यास तक्रार नोंदवा

कुणाही रुग्णवाहिकाधारकाने जादा दर आकारल्यास तत्काळ आरटीओ कार्यालयाच्या mh27@mahatranscom.in
या पत्त्यावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गित्ते यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews