आदरातिथ्य क्षेत्रातील हॉटेल व्यवसायांना मिळणार औद्योगिक दर्जा

आदरातिथ्य क्षेत्रातील हॉटेल व्यवसायांना मिळणार औद्योगिक दर्जा

 
_उद्योगाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अर्ज आमंत्रित_

_अर्ज सादर करण्यासाठी www.maharashtratourism.gov.in संकेतस्थळ उपलब्ध


अमरावती, दि. २४ : आदरातिथ्य क्षेत्र हा पर्यटन व्यवसायातील मुख्य सेवा उद्योग असून महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. तसेच हा व्यवसाय राज्याला परकीय चलन मिळवून देण्याचे एक परिणामकारक साधन आहे.

कोविड -19 च्या संकटानंतर राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्यास या क्षेत्राचा निश्चितच मोठा हातभार लागणार आहे. राज्यात पर्यटन व्यवसायाची नियोजनबद्ध व योग्य वाढ करण्यासाठी व राज्यात उच्चतम पर्यटन साधन संपत्ती असलेल्या क्षेत्राचा अग्रक्रमाने, जलदगतीने विकास होण्याच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्रातील व्यावसायांना उद्योगचा दर्जा देऊन त्यांना वीज दर, वीज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक व अकृषिक कराची आकारणी आता औद्योगिक दराने करण्यात येणार आहे.

ज्या हॉटेल व्यावसायिकांनी केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणी केली आहे अश्या हॉटेल व्यावसायिकांना दि . 1 एप्रिल 2021 पासून सदर सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मात्र, ज्या हॉटेल व्यावसायिकांनी केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणी केलेली नाही व जे किमान मूलभूत दर्जा ( Basic Minimum Standards ) प्राप्त करून ज्यांना उद्योगाचा दर्जा मिळवावयाचा आहे.

ज्या हॉटेल व्यवसायकांना उद्योगाचा दर्जा मिळविण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 12 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयात नमूद परिशिष्ट “अ” मधील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांना ग्रीन हॉटेलचा दर्जा मिळवायचा आहे त्यांनी परिशिष्ट "ब" मधील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अश्या हॉटेल व्यावसायिक अर्जदारांनी सर्व कागदपत्रांसह www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

अर्ज प्राप्तीनंतर उपसंचालक पर्यटन अमरावती विभाग यांचेकडून सर्व कागदपत्र व निकषांची तपासणी केल्या जाईल व निकषांची पूर्तता होत असल्यास त्यांना उद्योगाचा दर्जा प्रदान करण्यात येईल. त्यामुळे अमरावती विभागातील आदरातिथ्य क्षेत्रात काम करण्याऱ्या जास्तीतजास्त हॉटेल व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक पर्यटन अमरावती विभाग यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews