बहीण गेली, पण तिने कर्तव्यात पडू दिला नाही खंड

_बहिण जाण्याचे दु:ख अत्यंत यातनादायी होते. मात्र, माझ्या कार्यक्षेत्रात कुणाच्याही कुटुंबात असे घडू नये, इतकाच माझा प्रयत्न आहे. माझी बहिण गेली. तसेच इतरांच्याही कुटुंबात कुणाची आई, कुणाची पत्नी, कुणाची मुलगी, तर कुणी पूर्ण कुटुंबच हरवून बसले. सगळी मानवजात संकटात असताना वैयक्तिक दु:खाने खचून जाण्याची ही वेळ नव्हती. म्हणून मी बहिणीच्या अंत्यविधीला ऑनलाईन उपस्थित राहिले आणि आरोग्यसेविका म्हणून माझे कर्तव्य बजावले._
  श्वेता जैस्वाल
आरोग्य सेविका, नरसिंगपुर


अमरावती, दि. १३ : सख्खी बहिण गेली; पण त्यांनी आपली ड्युटी सोडली नाही. बहिणीच्या अंत्यविधीला ऑनलाईन उपस्थित राहून आरोग्यसेविका श्वेता जैस्वाल यांनी आपले कर्तव्य पूर्ण करण्यास प्राधान्य दिले.  
कोरोना महामारीच्या काळात शहरांसह खेडोपाडीही विविध दवाखान्यांतून अनेक पारिचारिका, आरोग्यसेविकांनी जीवाची पर्वा न करता अखंड रूग्णसेवेला वाहून घेतले आहे. अमरावती तालुक्यातील नरसिंगपूर उपकेंद्रात कार्यरत एका आरोग्यसेविकेने स्वत:च्या सख्ख्या बहिणीच्या अंत्यविधीलाही प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहून आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले.

 आरोग्यसेविका श्वेता जैस्वाल या शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नरसिंगपूर उपकेंद्रात कार्यरत आहेत. त्यांच्या बहिण पुणे येथील रूग्णालयात दाखल होत्या व उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सख्खी बहिण जाण्याची वेदना मोठी होती. पण श्वेताताईंनी स्वत:ला सावरले व कर्तव्याला प्राधान्य दिले. श्वेताताई या आरोग्यसेविका म्हणून लसीकरणाची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत.

कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणा जोखमीच्या क्षेत्रात आघाडीवर राहून काम आहे. अनेक अडचणी येत आहेत. उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून अहोरात्र अनेक कामे पार पाडावी लागत आहेत. कोरोना महामारी हे अखिल मानवजातीवरचे संकट आहे. अशा काळात वैयक्तिक दु:ख बाजूला सारून श्वेताताईंनी कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला.
Previous Post Next Post
MahaClickNews