कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण यंत्रणांनी सर्वंकष प्रयत्न करावे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 15 : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या काळात ग्रामीण भागात बाधितांची वाढती संख्या पाहता ग्रामीण यंत्रणांनी, तसेच ग्रामस्तरीय समित्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज असून, त्यात ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समित्यांची महत्वाची भूमिका आहे. राज्य शासनाने आता प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार सुविधांची तजवीज करतानाच सर्व डॉक्टर्सना कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उद्या रविवारी दुपारी 12 वाजता सोशल मिडियावरील एका विशेष कार्यक्रमात डॉक्टर मंडळींशी संवाद साधणार आहेत. उपचार सुविधांची ठिकठिकाणी नव्याने उभारणी करण्याची गरज लक्षात घेऊन शासन व प्रशासनाकडून तसा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर गावपातळीवर कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, आरोग्यसेवक, आशाताई, अंगणवाडी सेविका या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

*लक्षणे जाणवताच उपचार आवश्यक*

 

या काळात ग्रामीण आरोग्य यंत्रणेने लक्षणे जाणवणा-या प्रत्येक रुग्णाला वेळीच ‘प्रिव्हेंटिव्ह’ उपचार सुरु करावेत जेणेकरून जोखीम कमी होईल. जिल्ह्यात लस, ऑक्सिजन, रेमडिसिविरचे व्यवस्थापन जिल्हा यंत्रणेकडून होत आहे. गरजेनुसार ही सर्व सामग्री उपलब्ध करुन घेण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना अधिक धोका असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. म्युकरमायकोसिस आजाराचे रूग्णही आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जाणीवजागृती करणे, लक्षणे आढळणा-यांना वेळीच उपचार मिळवून देणे व होम आयसोलेशनमधील बाधितांशी आरोग्य यंत्रणेने नियमित समन्वय ठेवणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

                                                *बेजबाबदार  व्यक्तीवर वेळीच कारवाई करा*

 गृह विलगीकरणातील व्यक्तीने विहित कालावधीत विलगीकरणात राहून उपचार घेणे आवश्यक असते. लक्षणे नसलेली व्यक्ती विलगीकरणात न राहता घराबाहेर पडल्यास त्यांच्यापासून इतरांना धोका होऊ शकतो. अशी  एखादी बेजबाबदार व्यक्ती ऐकत नसेल व स्वत:सह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत असेल तर वेळीच पोलीसांना माहिती द्यावी. ग्रामस्तरीय समित्यांना पोलीसांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी ग्रामीण पोलीस यंत्रणेला दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews