उपचार सुविधा पुरविण्याबरोबरच नियमांचेही काटेकोर पालन होणे आवश्यक - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 25 : ग्रामीण भागात कोविडबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती तालुक्यातील ग्रामीण भागाची पाहणी केली. ग्रामीण भागात परिपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच  सर्व दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणेही आवश्यक असल्याचे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

 

पालकमंत्र्यांनी आज अमरावती तालुक्यातील देवरा शहिद येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

 देवरा येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यानुसार आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक उपचार आदी कार्यवाही होत आहे. सध्या तिथे पाच ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. या अनुषंगाने पुरेशा उपचार सुविधा देतानाच कंटेनमेंट झोन, होम आयसोलेशनमधील रुग्णांवर देखरेख, सातत्याने संपर्क व समन्वय या बाबी काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने प्रत्येक केंद्राची गरज लक्षात घेऊन आवश्यक प्रस्ताव वेळेत सादर करावेत. जिल्हा प्रशासनाशी नियमित समन्वय ठेवावा. गावपातळीवर लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिकांनी समन्वयाने साथ नियंत्रणासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पाच हजार मास्क व सॅनिटायझर सामग्रीचे वितरणही करण्यात आले. गावातील लसीकरण केंद्रालाही त्यांनी भेट दिली. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण नियोजनपूर्वक करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे आदेश प्रशासनाला दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews