यशोमती ठाकूर
(साभार ; श्रद्धा बेलसरे यांचे लेखन)
यशोमतीला मी प्रथम पाहीले ते विधानसभेत!। ती सभागृहात तावातावाने काहीतरी बोलत होती. मी माझ्या सहका-याला विचारले, “या कोण बाई आहेत?” त्याने सांगितले, “या अॅडव्होकेट यशोमती ठाकूर. कॉंग्रेसच्या राहुल ब्रिगेडच्या आमदार!”
सावळा वर्ण, धारदार नाक, टपोरे डोळे, इंदुरी, चंदेरी भारदस्त साडीचा दोन्ही खांद्यांवरून घेतलेला आदबशीर पदर. अशी ही मुलगी मला पहिल्या भेटीतच आवडली. हे काहीतरी वेगळे पाणी आहे हे त्या दिवशीच जाणवून गेले. पुढे काही प्रसंगाने परिचय झाला. आमच्या सचिवांच्या कार्यालयात एकदोन भेटी झाल्या. ती प्रत्येकवेळी माझ्या हातातले मोठ्या डायलचे घड्याळ बघुन म्हणायची, ‘ताई, तुमचे घड्याळ फार छान आहे.’ तिस-या वेळी जेंव्हा ती माझ्या घड्याळ्याबाबत बोलली त्यावेळी मी माझ्या नकळत घड्याळ काढून तिला दिले. तिनेही विचार न करता तिचे घड्याळ मला दिले. मग वारंवार आम्ही माझ्या मंत्रालयातील माझ्या ऑफिसमध्ये भेटू लागलो. मी माहिती खात्याची संचालक आणि ती सत्ताधारी पक्षाची आमदार! माझ्याकडून या परिचयात योग्य अंतर राखणे क्रमप्राप्त होते.
मात्र एकदिवस ती आली तेंव्हा जरा बावरलेली दिसत होती. म्हणाली, ‘ताई, मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे. मी म्हटले, ‘बोला ना मॅडम.’ यशोमती हळू आवाजात म्हणाली, ‘बाहेरच्या तुमच्या पी.ए.ला सांगा थोडा वेळ आत कुणाला पाठवू नका.’ तिने माझे हात हातात घेतले आणि म्हणाली, ‘मला आजपासून तुम्हाला आई म्हणायची इच्छा आहे. मी तसे म्हटले तर चालेल का?’ माझ्यासाठी हे सारे अनपेक्षित होते. माझ्याकडून चटकन काही प्रतिक्रिया उमटली नाही. त्यावर ती काहीच बोलली नाही पण तिचे डोळे डबडबले होते. तिच्या निरागस मागणीने व लाघवी स्पर्शाने माझा संकोच मात्र मावळला. आम्ही त्या क्षणी एकमेकीना जणू दत्तक घेतले.
तिवस्याची आमदार म्हणून ती अमरावतीहून दर मंगळवारी मुंबईत यायची. बरोबर ११वाजता मला भेटून कामाला लागायची. रात्री आम्ही चर्चगेटच्या माझ्या घरी राहत असू. घरी मी आणि माझे पती असे दोघेच असल्याने घर एरव्ही शांत असे. पण त्या दिवशी तिच्या चिवचिवाटाने घर भरून जाई. खूप छान दिवस होते ते!
यशोमतीचा कामाचा धडाका फार अचाट आहे. पहाटे पाच वाजताच तिचे काम सुरु होते. आधी मुलांना फोन करून ती उठवते. मग मतदार संघातल्या लोकांचे फोन येऊ लागतात. तिलाही काही करावे लागतात. दहा वाजता ती मंत्रालयात हजर असते. दिवसभर वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न घेऊन मंत्रालयातील वेगवेगळ्या टेबलवर फिरताना तिला कंटाळा कसा येत नाही हा मला प्रश्न पडायचा. आता मात्र तीच मंत्री आहे. इतके मोठे पद मिळवले असूनही तिला त्याचा काहीही गर्व नाही. ती आजही ख-या अर्थाने स्वावलंबी आहे. ड्रायव्हर नसेल तर अडून न बसता ती स्वत: गाडी चालवते. प्रसंगी स्कूटरवरूनही फिरते. कपड्यांना इस्त्री नसेल तर आजही ही मुलगी पटकन स्वत:च इस्त्री करते. क्वचित कामावाली आली नाही तर कपड्यांचा आणि भांड्याचा डोंगर लीलया साफ करते. कुठलेच काम करायला तिला कमीपणा वाटत नाही! अमरावतीला असताना मतदारसंघात फिरताना ती दिवसाला १०/१५ किलोमीटर तर सहजी चालते. घराघरातील लोकांचे प्रश्न तिला माहित असतात. गावातल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे यासाठी तिने ‘मस्तीकी पाठशाला’ हा उपक्रम सुरु केला आहे. ‘स्पर्धा परीक्षां’साठी तिने प्रशिक्षण-केंद्रही सुरु केले.
आपल्या मतदारसंघात चांगले खेळाडू तयार व्हावेत म्हणून मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम उभारले आहे. विविध खात्यांशी संपर्क साधून तिने मतदारसंघासाठी मोठा निधी मिळवला आहे. आता कोविडच्या काळात पेशंटची व्यवस्था व्हावी यासाठी ती सतर्क असते. रुग्णालयांची व्यवस्था बघण्यासाठी ती पी.पी.ई. कीट घालून त्या वॉर्डातही जाते.
यशोमतीचा गावापासून दिल्लीपर्यंत अफाट जनसंपर्क आहे. हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. ती आपली बाजू प्रसंगी समजावून सांगून आणि प्रसंगी आक्रमक रूप धारण करून मांडत असते. मध्यंतरी तर तिने अमरावतीला १५ दिवसांची टाळेबंदी लावून घेतली होती. त्यावर विधानसभेतही खूप टीका झाली. या बाईने त्याला काहीही उत्तर दिले नाही. पण पुढील काळात तिचा निर्णय किती दूरदर्शिपणाचा होता हे रुग्णांच्या संख्येवरून सिद्ध झाले. मग तोच ‘अमरावती पॅटर्न’ राज्यभर लागू करावा लागला.
अमरावतीच्या घरी तर सकाळी ८वाजता ती लोकांना भेटायला तयार असते. घराच्या आतच असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये येऊन बसते. मतदारसंघात तिचे दौरे जवळजवळ रोजच सुरु असतात. पुराणकाळातील रुक्मिणीचे माहेर कौंडीण्यपूर तिच्या भागात येते. त्या तीर्थक्षेत्राचा तिने इतका देखणा विकास केला आहे कि नदीकाठीचा घाट बघत रहावासा वाटतो. इथूनच गेल्या ४००वर्षांपासून पंढरपूरला पालखी जात असे. काही कारणाने त्यात खंड पडला होता. तिने तो पालखीसोहळा पुन्हा सुरु केला. दरवर्षी काहीही परिस्थिती असली तरी गुरुपौर्णिमेला यशोमती पंढरपूरला जाते. “विठ्ठल माझा, मी विठ्ठ्लाचा” ही वारीतली घोषणा तिच्या फार आवडीची आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये तिने ग्रामसचिवालये उभी केली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कल्पनेतील हा अविष्कार आहे.
विधानसभेची २०१४ची निवडणूक तिच्यासाठी फार मोठी परीक्षा होती. याशोमतीची सख्खी बहिण तिच्याविरुद्ध उमेदवार म्हणून उभी राहिली होती. त्यांनी तिला नामोहरम करण्यासाठी अनेक अस्त्रे वापरली. आपल्या समाजात स्त्रियांसाठी बदनामीचे अस्त्र फार जीवघेणे असते. पण ते हलाहल पचवून लाटेच्याविरुद्ध ती मोठ्या मताधिक्याने निवडून आली. या सर्व काळात विरोधक पातळी सोडून बोलत होते. अपप्रचार करत होते. पण या मुलीने मात्र कधीही कुणाबद्दल विपरीत शब्द तोंडातून बाहेर काढला नाही.
आता माझी ही कर्तुत्ववान मुलगी मंत्री झाली आहे. तिच्या आवडीचे ‘महिला आणि बालकल्याण’ खाते तिला मिळाले आहे. आंगणवाडी सेविकांचा पगार वाढवणे असो किंवा टाळेबंदीच्या काळात शरीरविक्री करणाऱ्या महिलांना उदरनिर्वाहासाठी धान्य पुरवठा असो, अशा कठीण काळातही नेमक्या गरजेच्या अनेक गोष्टी तिने न बोलता केल्या. इतक्या सगळ्या व्यापात तिचे घरच्यांकडे असते तसेच माझ्याकडेही बारीक लक्ष असते. भेटल्याबरोबर एक्सरे काढावा तसे ती क्षणात सारे टिपून घेते. मग तिच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. तिला स्वच्छतेची अतिरेकी आवड आहे. तिला घरात नसलेला कचराही दिसतो. ती येणार म्हटल्यावर आम्हाला घराची जरा जास्तीची सफाई करावी लागते. तरीही कुठे काही दिसले की या बाई हातात झाडू घेऊन कामाला लागल्याच समजा!
ती मंत्री झाली तेंव्हा तिला विभागाचा पदभार घ्यायचा होता. मी पुण्याहून यावे म्हणून तिने फोन केला. मी म्हटले, ‘अग माझीही खूप इच्छा आहे पण ड्रायव्हर नाही, थोडी अडचण आहे. त्यावर ती म्हणाली, “ठीक आहे फार टेन्शन घेऊ नका पण तुमचा आशीर्वाद असू द्या.’ लेक एवढी प्रेमाने बोलावते आणि मी जाऊ शकत नाही हे मला कसेसेच वाटत होते. आंम्ही अनेक खटपटी करून ड्रायव्हर मिळवला आणि थेट तिच्या ऑफिसमध्ये धडकलो तर तिथे ही गर्दी! थोड्या वेळाने आम्हाला बघून ती जवळ आली. अनपेक्षितपणे आम्ही पोहोचलेलो पाहून ती खूप खुश झाल्याचे जाणवत होते. आधी मला व श्रीनिवासला खाली वाकून पाया पडली मग माझ्या गळ्यात पडली. मी म्हटले, ‘मॅडम, तुम्ही मंत्री आहात आता असे वाकायचे नाही.’ तर हसत म्हणाली, “आई बाबासमोर तर खाली वाकायलाच हवे ना!”
कोरोनाचा पहिल्या टाळेबंदीचा काळ होता. एकदा मी फोनवर तिला बोलून गेले, ‘यशोमती जास्त फिरत जाऊ नकोस. मला खूप आठवण येते, काळजी वाटते.’ तर म्हणाली, ‘या मुंबईत’ मी म्हणाले, ‘अग बाई, टाळेबंदीत कसे शक्य आहे?’ यशोमती यावर काही बोलली नाही. सर्वसाधारण बोलणे होऊन संभाषण संपले. मात्र दोनचार दिवसांनी सकाळीच फोन वाजला. फोनवर यशोमतीच होती, म्हणाली, ‘तू कुठे आहेस?’ मी म्हटले, ‘घरीच!’ तर म्हणाली, ‘मी १५ मिनिटात पोहोचते.’ ती माझ्या पुण्याच्या घरी आली त्यावेळी विमान, रेल्वे, बसेस सगळे बंद होते. ती गाडीने नेहमीप्रमाणे मुंबईहून अमरावतीला जात होती. मुंबई, नाशिक, जळगाव, अकोला असा तिचा मार्ग होता. तो सोडून आमच्या दोन दिवसापुर्वीच्या बोलण्यामुळे तिने उलट वळसा घेऊन किमान ५ तासाचा प्रवास वाढवून घेतला! माझे मन भरून आले. कोरोनाची साथ सुरु झाली तेंव्हाच तिने मला ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर पाठवून दिले आणि वर दम दिला ‘घराच्या खाली उतरायचे नाही. काही लागले तर मला फोन कर.’
जानेवारीत कोरोनाचा कहर थोडा कमी झाल्यावर मी तिचा बंगला पाहण्यासाठी मुंबईत गेले. ती नेहमीप्रमाणे बिझी होती. संध्याकाळी मी आणि रवी फिरायला बाहेर गेलो. माझ्या चपलेमुळे दोन वेळा माझा पाय सटकला. घरी परत आलो तर पुन्हा जनता दरबार भरलेला! मी आत जाऊन बसले. थोड्या वेळाने मला बाहेर बोलावले गेले. यशोमती अचानक म्हणाली, ‘तुझी चप्पल दाखव.’ म्हणजे रवीने बातमी दिली असावी. मी माझी चप्पल दाखवली. ‘अशा टाचेची चप्पल टाकून दे. त्याने तोल जातो.’ मी म्हटले, ‘अग चप्पल नवी आहे!’ तिकडे अजिबात लक्ष न देता ती म्हणाली, ‘ही घालून बघ.’ तिच्या पायातली चप्पल मला घालायला लावली योगायोगाने ती मला बरोबर बसली. मी आत गेले. रात्री ती आत आली आणि मला म्हणाली, ‘चल आपल्याला बाहेर जायचे आहे.’ आम्ही ‘मेट्रोशूज’मध्ये गेलो तिथे तिने मला अजून चार चपला घ्यायला लावल्या. वर ‘आता नीट आणि चांगल्या चपला घालत जा.’ असा दमही दिला.
तिची एक गम्मत असते. ती सगळी कामे संपवून झोपायला आली की मला म्हणते, ‘तू आज झोपायचे नाहीस. आपल्या गप्पा राहिल्या आहेत. आज आपण खूप गप्पा मारुया.’ मी मान डोलावते. ती माझा हात घट्ट हातात धरून काही बोलायच्या आत क्षणार्धात लहान मुलीसारखी घोरायलाही लागते. ती एवढी थकलेली असते की मला ते सहज लक्षात येते आणि हसू येते.
माझ्या या धाडसी, कर्तबगार लेकीला नियतीने मात्र फार खडतर आयुष्य दिले आहे. केवळ २८व्या वर्षी वैधव्य आले. वडिलांचा वारसा म्हणून राजकारणात उतरल्यावर तिथेही अनेक चढउतार खाचखळगे बघावे लागले. वडिलांचे अल्प आजारात झालेले अकाली निधन हाही मोठा धक्का होताच त्यावर सख्या नातेवाईकांच्या भाऊबंदकीला तोंड ध्यावे लागले.
माझे देवाकडे इतकेच मागणे आहे की ‘देवा, आता माझ्या आयुष्यातील सुखाचे दिवस तिला मिळू दे.’
*******
-श्रद्धा बेलसरे-खारकर
मो ८८८८९ ५९०००