पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना उपाययोजनांचा आढावा म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी, तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना उपाययोजनांचा आढावा
म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी, तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड
सुपर स्पेशालिटीत बालकांसाठी, तर इर्विनमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी वॉर्ड 

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


अमरावती, दि. 14 : कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहित धरून लहान मुलांसाठी, तसेच अलीकडच्या काळात म्युकरमायकोसिसचे रुग्णही आढळत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञ व ईएनटी तज्ज्ञांच्या सहभागासह आरोग्य यंत्रणेची ऑनलाईन बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुमित लहाने, डॉ. महल्ले, डॉ. पाचबुद्धे यांच्यासह अनेक बालरोगतज्ज्ञ व ईएनटी तज्ज्ञ या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते.

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नव्याने उभ्या राहणा-या अडचणींवर आपण वेळीच मात करणे आवश्यक आहे. लहान मुलांना तिस-या टप्प्यात अधिक धोका असल्याची तज्ज्ञांचे मत आहे. ते लक्षात घेऊन आवश्यक उपचार सुविधा उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी सर्व उपचार सुविधांची सुसज्ज असा स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

  *सुपर स्पेशालिटीच्या ‘फेज-वन’ इमारतीत होणार वॉर्ड*

त्यानुसार लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील फेज – वन इमारतीत उभारण्याचा निर्णय झाला. लहान मुलांमधील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तत्काळ हालचाली करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

  *म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड*

म्युकर मायकोसिस रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये आढळत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी सर्व सुसज्ज उपचार सुविधांसह स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र वॉर्ड उभारण्याचा निर्णय झाला.  

 लहान मुलांसाठी सुसज्ज आरोग्ययंत्रणा उपलब्ध असण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स, तसेच म्युकरमायकोसीस आजाराचाही काही ठिकाणी आढळलेला प्रादुर्भाव पाहता ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करण्यात आले आहे.  

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर *महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार* करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.या आजारावरील औषध महागडे असून, त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रूग्णालयांमध्ये या आजाराच्या रूग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. या आजाराच्या जाणीवजागृतीबाबत मोहिम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

      *म्युकरमायकोसिसबाबत* 

ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे व त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. या आजारात नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका आढळून येतो. वेळेत उपचार झाले नसल्यास डोळे, श्वसन व मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असते. या आजारामुळे कोरोना रूग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणा-यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews