तिवसा उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथे 20 पदे भरण्याबाबत मंजुरी पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

अमरावती, दि. ८ : _तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी २० पदांना मंजुरी मिळाली असून, तसा शासन निर्णयही निर्गमित झाला आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली._

जिल्ह्यात रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, इमारती, साधनसामग्री याबरोबरच मनुष्यबळ निर्मितीसाठी पालकमंत्र्यांकडून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा होत आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदने, चर्चा याद्वारे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे रुग्णालयात साधनसामग्री निर्माण होण्याबरोबरच मनुष्यबळ पदनिर्मितीची प्रकिया सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व रुग्णालयात आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे, इमारतींची उभारणी, आवश्यक तिथे श्रेणीवर्धन अशी अनेक कामे होत आहेत. ती गतीने पूर्ण करण्यात येतील. कुठेही निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी दिली.

तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात २० पदांची निर्मिती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र, शस्त्रक्रिया कक्ष सहायक, औषधी निर्माण अधिकारी, सहायक अधिसेविका, परिसेविका आदी विविध पदांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होऊन उपचार यंत्रणा अधिक सुसज्ज होणार आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews