एकही बालक योग्य संगोपनापासून वंचित राहता कामा नये - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

_कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना संरक्षण व संगोपन_
एकही बालक योग्य संगोपनापासून वंचित राहता कामा नये
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर


अमरावती, दि. ४ : कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या संरक्षण व संगोपन योग्यरीत्या व्हावे यासाठी अशा बालकांपर्यंत पोहोचून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. असे एकही मूल संगोपन योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 
अनाथ बालक संगोपन टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली,  त्यावेळी  त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. दिलीप रणमले, महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे आदी उपस्थित होते.

 पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोविड साथीच्या काळात बालकाला संरक्षण, संगोपनाबाबत कुठलीही समस्या येत असेल तर त्याचे तत्काळ निराकरण होणे व त्यांना योग्य निवारा मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न व्हावेत. लोकप्रतिनिधी, विविध संस्था यांचे सहकार्य मिळवून बाल संरक्षण कक्षाद्वारे अनाथ बालकांना संगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा. कोरोनाकाळात इतरही आजाराने पालक मृत पावले असतील तर तशा अनाथ बालकांचीही माहिती  गोळा करून त्यांच्याही योग्य संगोपनाच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी. दोन्ही पालक नसलेली अनाथ बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने अशा बालकांचा सर्वदूर शोध घ्यावा. एकही अनाथ मूल संगोपन योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 जिल्ह्यात कोरोनामुळे एक किंवा दोन पालक गमावलेले १६६ बालके आहेत. त्यात दोन्ही पालक मृत्यू पावलेली ८ बालके आहेत. त्यांना संगोपन योजनेचा लाभ किंवा आवश्यकतेनुसार संस्थेत दाखल करुन प्रक्रिया होत आहे. नागरिकांनीही अशा बालकांबाबतची माहिती चाईल्डलाईन 1098 वर कळवावी, असे आवाहन श्री. भडांगे यांनी यावेळी केले. यानिमित्ताने जनजागृती पत्रकाचे अनावरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews