मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिचखेडा व जरूडच्या सरपंचांशी संवाद सरपंच आशा साकोम यांनी मुख्यमंत्र्यांना दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिचखेडा व जरूडच्या सरपंचांशी संवाद
गावातील पात्र नागरिकांचे संपूर्ण लसीकरण केले
सरपंच आशा साकोम यांनी मुख्यमंत्र्यांना दिली माहिती_

अमरावती, दि. ११ : कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्याभसाठी प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासोबतच गावातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात आले आहे, अशी माहिती चिचखेडाच्या सरपंच आशा साकोम यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियंत्रण करण्यासाठी गावपातळीवर केलेल्या उपाययोजनांबाबत सरपंचांशी दूरदृष्यप्रणालीव्दारे संवाद साधला.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, चिचखेडाच्या सरपंच आशा साकोम, जरूडचे सरपंच सुधाकर मानकर यांनी संवाद साधला. 
सरपंच श्रीमती साकोम यांनी गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वप्रथम प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यात. गावातील परिस्थिती हाताळाण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कोरोना आजाराबाबत नागरिकांनी पाळावयाच्या नियमाबाबत माहिती देण्यात आली. लसीकरणाबाबत नागरिकांचे गैरसमज दूर केले. यामुळे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील लसीकरण झाल्याने रूग्णसंख्या वाढीस आळा घालण्यास मदत मिळाली. लसीकरणाअभावी रुग्ण संख्या वाढू शकत असल्याने गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगण्यात आले. याचा फायदा म्हणून गावातील ४५ वर्षांवरील पात्र सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात यश आले. 
गावातील कोरोनाबाधीत रुग्ण शोधण्यासाठी रुग्णांचे संपर्क शोधण्यात आले. यासाठी आरोग्य विभागाची मदत घेण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सॅनिटाइजेशन, परस्परामधील अंतर राखणे, मास्कचा उपयोग तसेच हात धुण्यावर भर देण्यात आला. गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सचिवांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, घरातील सदस्यांमध्येही परस्परांमधील अंतर पाळणे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच आरोग्य विषयक सुचना दिल्या. याबाबत नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले. सध्यास्थितीत गावातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून प्रसार वाढणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून येणाऱ्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याची माहिती श्रीमती साकोम यांनी दिली.

Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews