कृषी पर्यटन केंद्र योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा -पर्यटन उपसंचालक विवेकानंद काळकर

अमरावती, दि. 8 : शेतकरी बांधवांना पूरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे व पर्यटकांना कृषीजीवनाचा आनंद मिळवून देणे या हेतूने कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन उपसंचालक विवेकानंद काळकर यांनी केले आहे.

या योजनेत कृषी पर्यटन केंद्राला पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारावर शेतक-यांना बँक कर्ज मिळू शकेल. त्याचप्रमाणे, वस्तू व सेवा शुल्क, वीज शुल्क यात सवलत, कृषी खात्याचे शेततळे व इतर योजनांत प्राधान्य, घरगुती गॅसजोडणीचा वापर व त्यानुसार वीज देयकाची आकारणी आदी बाबी प्रस्तावित आहेत.

                            शेती हाच प्रमुख व्यवसाय असावा

कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठी शेती हाच प्रमुख व्यवसाय व पर्यटन पूरक व्यवसाय असावा. केंद्र शहराच्या हद्दीपासून किमान 1 कि. मी. बाहेर व शक्यतो खेडेगावामध्ये असावे. कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी कमीत कमी 1 एकर शेती असावी. ज्या केंद्रात पर्यटन सहली आयोजिण्यात येतील, त्या केंद्राचे क्षेत्र किमान 5 एकर असावे. राहण्याची व्यवस्था व इतर सुविधा पर्यावरणपूरक असाव्यात. पर्यटकांना भोजन, पाणी आदी सोयी देणे बंधनकारक राहील. कृषी पर्यटन केंद्रासाठी पात्र व्यक्तींनी पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर किंवा अमरावती कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन श्री. काळकर यांनी केले.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास साधण्यासाठी कृषीपूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बांधवांनी पर्यटन केंद्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews