आरोग्य संवर्धनासाठी मेळघाटात झोन कार्यक्रमास सुरुवात

अमरावती, दि. 9 : कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे झोन कार्यक्रम उद्यापासून (10 जून) 17 जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दक्षतापूर्वक हा कार्यक्रम पार पाडण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिले आहेत.

            पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध राहावा, त्याचप्रमाणे कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी व्हावी यासाठी मेळघाटात नियमित सर्वेक्षण, संपर्क व उपचार यासाठी काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. झोन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा आरोग्य अधिका-यांनी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेऊन नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

                                    *मोहिमेत 76 पथके होणार सहभागी*

झोन कार्यक्रमासाठी 76 पथके गठित करण्यात आली आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. झोन कार्यक्रमात अंगणवाडीमध्ये जाऊन वजन घेणे, नंतर त्या बालकाचे ग्रेडेशन ठरवून सॅम व मॅम बालकांचे संनियंत्रण व उपचार केले जाते. तसेच ज्या बालकांना केंद्रात भरती करण्याची गरज आहे अशा बालकांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानंतर भरती करण्यात येऊन त्यांना आवश्यक उपचार मिळवून दिले जातात. गरज पडल्यास उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय येथून जिल्हा रुग्णालय येथे संदर्भ सेवा दिली जाते, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.

                  गरोदर माता तपासणी, स्तनदा माता तपासणी प्रतिबंध,उपचार व संदर्भ सेवा देऊन माता मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. कुपोषित असणा-या बालकांची तपासणी , दुर्धर आजारी असणा-या बालकांची तपासणी, कुष्ठरोग ,क्षयरोग, मलेरिया, गलगंड, सिकलसेल आदी आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी या कार्यक्रमामध्ये केली जाते.तसेच पाणी नमुने घेऊन ते तपासणीस पाठविले जातात. गावातील पिण्याच्या पाण्याच्या सर्वेक्षण केले जाते व जिथे लिकिजेस आढळले किंवा पिण्याच्या पाण्याचा टाकीच्या काही समस्या असल्यास त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायतमार्फत केला जातो. गावातील वृद्ध व्यक्ती असल्यास किंवा ज्यांना मोतिबिंदू आढळला त्यांची तपासणी व संदर्भ सेवा दिली जाते. विविध असणा-या योजनांचा पाठपुरावा करून लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. आरोग्यविषयक कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन  केले जाते, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे यांनी दिली. चिखलद-याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतिश प्रधान व धारणीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री नवलाखे यांनी नियोजन केले आहे.  

पथकांना नागरिकांनी योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर, जिल्हाधिकारी श्री. नवाल, जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews