जलसमृद्धीसाठी जिल्ह्यात विविध कामांना चालना_ पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांच्या हस्ते सुमारे अडीच कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ जलसमृद्धीसाठी जिल्ह्यात विविध कामांना चालना
  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती,  : जिल्ह्यात जलसमृद्धी निर्माण होऊन कृषी उत्पादकता वाढावी म्हणून गावोगाव सिमेंट नाले, बंधारे आदी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

मृद व जलसंधारण विभागातर्फे कठोरा खुर्द, टाकळी जहाँगीर, नांदगावपेठ व रामगाव आदी विविध ठिकाणी द्वारयुक्त सिमेंट नाल्यांच्या बांधकाम व खोलीकरणाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पं. स. सभापती संगीताताई तायडे, बाळासाहेब देशमुख, वीरेंद्र जाधव, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील कठोरा खुर्द येथील सिमेंट नाल्याच्या बांधकाम व खोलीकरण कामाचे मूल्य 1 कोटी 7 लाख रुपये, टाकळी जहाँगीर येथील कामाचे 77 लक्ष 90 हजार रुपये व नांदगावपेठ, रामगाव येथील कामाचे मूल्य 60.23 लक्ष रुपये आहे. अशी विविध कामे जिल्ह्यात ठिकठिकाणी हाती घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, नव्या कामांचेही नियोजन करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार सर्व कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जलसंधारणाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

            प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावे. विहित मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत. कुठलीही अडचण आल्यास वेळीच प्रशासनाला माहिती द्यावी. मात्र, कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews