अकोट ते नांदेड दरम्यान रेल्वेला ग्रिन सिग्नल केव्हा

रविंद्र इंगळे 
अकोट: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागांतर्गत अकोला ते अकोट दरम्यान गेज बदलून दोन वर्षे होत आहेत. परंतु आतापर्यंत या रेल्वे मार्गावर प्रवासी गाड्यांना ग्रिन सिग्नल मिळाला नसल्यामुळे परिसरात प्रचंड नाराजी आहे. अकोट ते अकोला-हिंगोली मार्गे नांदेड ही प्रवासी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी दक्षिण मध्य रेल्वे कडे केली होती.  त्यामुळे जर एक महिन्यात ही रेल्वे सुरू न झाल्यास दक्षिण मध्य रेल्वेच्या च्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा अकोट शहरातील व्यापारी तसेच रेल्वे संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे. 
उत्तर भारताला-दक्षिणेशी जोडणारा सर्वात जवळचा रेल्वेमार्ग असलेल्या खंडवा-अकोला-नांदेड रेल्वे मार्गावर, अकोला ते खंडवा मार्गे महु पर्यंत मीटरगेज चे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. या मीटरगेज रूपांतरणाच्या कामात अकोला ते अकोट दरम्यान रूपांतरणाचे काम पूर्ण झाले असून,२०१९ मध्ये रेल्वे मार्गाची पाहणी केल्यानंतर रेल्वे विभागाने १९ मे २०१९ रोजी वेगात इंजिन चालवून ट्रॅकच्या सामर्थ्याची तपासणी केली होती. ज्यामध्ये रेल्वे मार्ग वाहतुकीस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र रेल्वे सुरक्षा विभागाकडूनही देण्यात आले होते. सुरक्षा विभागाने  वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित  असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर नियमांनुसार पहिल्या टप्प्यात अकोट ते अकोला दरम्यान मालगाड्या धावू लागल्या.गेल्या अनेक महिन्यांपासून अकोला ते अकोट दरम्यान अनेक मालगाड्याची ये-जा झाली.
मात्र दक्षिण मध्य रेल्वेने आजवर प्रवासी गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे अकोला ते अकोट मार्गे तुकईथळ,अमलाखुर्द अशा १४ रेल्वे स्थानकांवर एकंदरीत प्रवास करणाऱ्या सुमारे लाखो रेल्वे प्रवासी गेल्या चार वर्षांपासून प्रवासी गाड्यांपासून वंचित राहिले आहेत. अकोला-खंडवा मीटर गेज ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून अकोला ते खंडवा दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद होती. 
अकोला ते खंडवा दरम्यान १७४ कि.मी.चे गेज रूपांतरणाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जात आहे. या मार्गावर खंडवा ते अमलाखुर्द दरम्यान ५३ कि.मी. आणि अमलाखुर्द ते अकोट दरम्यान ७७ कि.मी. प्रगतीपथावर आहे. 
पहिल्या टप्प्यात अकोला ते अकोट दरम्यान ४४.७९ कि.मी.चे गेज रूपांतरण झाले होते. रेल्वे सुरक्षा विभागाने दोन वर्षांपूर्वी सुरक्षा तपासणी केली आणि सुरक्षा प्रमाणपत्र ही दिले. तेव्हापासून बऱ्याच मालगाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र प्रवासी रेल्वे नसल्याने नागरिक प्रवासापासून वंचित राहिले आहेत.
अकोला रेल्वे स्थानकात अनेक गाड्या थांबतात. ज्यामध्ये अकोला आणि अकोला-काचीगुडा इंटरसिटीकडे जाणारे प्रवासी अकोट पर्यंत सहज नेता येतात. शिवाय अकोट हुन अकोला -वाशिम - हिंगोली ते नांदेड पर्यंत रेल्वे वाहतूक सुरू करण्याची मागणी विजय जितकर,  न.पा नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, रामदास काळे, लकी इंगळे, विजय शिंदे, मुकुंद कोरडे, मंगेश लोणकर यांच्या सह अमोल इंगळे, ठाकूर, गोयनका, वाशिम येथील डीआरयूसीसी सदस्य गुलाटी, जुगलकिशोर कोठारी, हिंगोली येथील राकेश भट, शोएब वासेसा, स. रियाज आदींनी यापूर्वीच केली आहे. 

केंद्रात संजय धोत्रे मंत्री असूनही रेल्वे सुरू नाही

अकोट ते अकोला दरम्यानचा संपूर्ण रेल्वे मार्ग अकोला लोकसभा मतदार संघात येतो. संजय धोत्रे गेल्या तीन वेळा या लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत. सध्या ते केंद्रातील राज्यमंत्री आहेत.  या रेल्वे मार्गाकरीता त्यांचे मोठे योगदान आहे. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या क्षेत्रात अकोट ते अकोला दरम्यान साधी रेल्वे सुरू करणे कठीण काम नाही.तसेच अकोट येथून रेल्वे सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश भारसाकळे, लोकप्रतिनिधी यांनी सुध्दा पुढाकार घेण्याची गरज आहे.

प्रवासी रेल्वे एक महिन्यामध्ये सुरू करा - विजय जितकर दोन वर्षांपासून अकोट-अकोला गेज बदलण्यात आले आहे, चार वर्षांपासून अकोट व त्याच्या आसपासच्या परिसरातील अनेक शेकडो गावे गाड्यांपासून वंचित राहिली आहेत, रोजगार व व्यवसाय ठप्प झाला आहे. आता गेज बदलण्यात आले आहे, त्यामुळे एससीआरने अकोला पर्यंत येणाऱ्या रेल्वे गाड्या अकोट पर्यंत कराव्यात तथा अकोट ते नांदेडला जाण्यासाठी  रेल्वे सुरु करावी अशी मागणीसाठी सेवानिवृत्त शिक्षक तथा समाजसेवक विजय जितकर यांनी केली आहे. रेल्वेगाडी चालविण्यास एससीआरने सुरवात करावी. एका महिन्यात ही मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विजय जीतकर यांनी दिला.

पावसाळ्यात  पुर्णा नदीला पूर आल्यामुळे अकोला-अकोट रोड नेहमी बंद पडतो. शिवाय या रोडचे काम संथगतीने सुरु आहे. या रोडर अपघाताची मालीका सुरू असुन अनेकांचे जीव जात आहेत. अशा जिवघेणा स्थितीत रेल्वे सेवा सुरु होणे अत्यावश्यक आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews