योग्य उपचारांनी भाग्यश्रीच्या प्रकृतीत सुधारणा

पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर  आजारी बालिकेच्या उपचारांसाठी अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांचा पुढाकार

योग्य उपचारांनी भाग्यश्रीच्या प्रकृतीत सुधारणा


अमरावती, दि. २६ :  जिल्ह्यातील देवरा या गावातील चिमुकल्या भाग्यश्रीची प्रकृती जन्मत: कमी वजन आणि मेंदूमध्ये झालेले इन्फेक्शन यामुळे   बिघडली होती. हे कळताच तातडीने उपचार मिळवून देण्याचे निर्देश यंत्रणेला देतानाच, बालिकेवर चांगल्या रुग्णालयात उपचार होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत अंगणवाडी सेविका व नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून चिमुकलीला उपचार मिळवून दिले. आता या बालिकेच्या प्रकृतीत चांगली सुधारणा आहे. पालकमंत्र्यांनी आज तिची भेट घेऊन विचारपूस केली व आर्थिक मदतही केली.

देवरा येथील भाग्यश्री या कुपोषित बालिकेला चांगल्या उपचारांची गरज होती. महिला आणि बालविकास मंत्री  यशोमतीताई ठाकूर यांनी आवाहन केल्यानंतर अंगणवाडी सेविका उमा वाघमारे यांच्या समन्वयाने आणि विविध नागरिक व कार्यकर्त्यांनी  गावातून लोकवर्गणी गोळा केली तसेच भाग्यश्रीच्या उपचारांचा खर्च करण्याची जबाबदारी उचलली. यानंतर भाग्यश्रीवर नागपूरमध्ये उपचार करण्यात आले. आता भाग्यश्रीची तब्येत चांगली झाली असून ती घरी परतली आहे. 


मंत्री यशोमतीताईंनी आज देवरा इथे भाग्यश्रीच्या घरी जाऊन विचारपूस केली तसेच तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली. 
त्याचबरोबर या सर्व काळात भाग्यश्रीच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणाऱ्या आणि भाग्यश्रीच्या उपचारासाठी लोकवर्गणी गोळा करणाऱ्या अंगणवाडी सेविका कुमारी उमा वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.


Previous Post Next Post
MahaClickNews