मतदार यादीत सुधारणेसाठी मोहिम यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन

अमरावती, दि. १० : मतदार यादीत अद्यापही छायाचित्र ‘अपडेट’ नसलेल्या मतदारांनी ते 15 जूनपूर्वी जमा करावे. छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत करण्याचे राष्ट्रीय कार्य सुरु असल्यामुळे संबंधित मतदारांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

 *यादीत नमूद पत्त्यावर न आढळणा-यांची नावे वगळणार*

            जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या अद्ययावत होत आहेत. त्यासाठी मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्रे मिळवून ते यादीत अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीही देतात. मात्र, अनेकदा मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. अशा मतदारांची नावे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी अधिनियम 1960 मधील तरतूद व भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वगळण्यात येत आहेत.

*यादी ‘वेबसाईट’ला उपलब्ध आहे*

मतदार यादीत ज्या मतदारांची छायाचित्रे समाविष्ट नसतील (नो फोटो व्होटर्स) अशा मतदारांची यादी   www.amravati.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडून पडताळणीही होत आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी 15 जूनपूर्वी आपली छायाचित्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालय किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews