जिल्हाधिका-यांकडून चांदूर रेल्वेला भेट घुईखेड येथील कोविड केअर सेंटर सुरु - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 1 : कोरोना प्रतिबंधात्मक अंमलबजावणीत ग्रामीण स्तरावर उपचार यंत्रणेचा विस्तार करण्यात येत आहे. घुईखेड येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, तिथे 15 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. बाधितांना प्रभावी उपचार मिळवून देतानाच कोविडपश्चात घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शनही करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज चांदूर रेल्वे येथे दिले.

जिल्हाधिका-यांनी आज चांदूर रेल्वे येथे भेट देऊन यंत्रणेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार राजेंद्र इंगळे, मुख्याधिकारी मेघना वासनकर, वैद्यकीय अधिक्षक विपीन मरसकोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती निकोसे, सहायक निबंधक राजेंद्र मदारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिका-यांनी घुईखेड येथील कोविड केअर सेंटर व चांदूर रेल्वे येथील लसीकरण केंद्राला यावेळी भेट दिली व तेथील आरोग्य कर्मचारी, तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून व्यवस्थेची माहिती घेतली.

                        पीक कर्ज वितरणाला गती द्यावी

जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी चांदूरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट देऊन पीक कर्ज वाटपाची माहिती घेतली. पात्र शेतक-यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ग्राम समित्यांच्या सहकार्याने अर्जदारांना योग्य माहिती देऊन परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत. एकही पात्र व्यक्ती कर्जापासून वंचित राहता कामा नये. ही प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बग्गी ते मोगरा येथील पांदणरस्त्याच्या कामाची पाहणीही जिल्हाधिका-यांनी या दौ-यात केली. प्रशासनाने नियोजित कामांना वेग देताना आवश्यक तिथे पांदणरस्त्यांचे प्रस्ताव सादर कऱण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews