दिव्यांगांच्या लसीकरणासाठी दर शनिवारी विशेष शिबिर- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 3 : कोविड प्रतिबंधक लसीकरणात ज्येष्ठ व्यक्ती व दिव्यांगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर, दर शनिवारी दिव्यांगांच्या लसीकरणासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्याचबरोबर अनाथ बालक संगोपन जिल्हा कृती दलाची (टास्क फोर्स) ऑनलाईन बैठकही त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांच्यासह बाल संगोपन कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.  

 जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, ठिकठिकाणी नियमितपणे होणा-या लसीकरणात वृद्धजन, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर, दिव्यांगासाठीच्या शाळा, वसतिगृहे, पुनर्वसन केंद्रे, निवासी संस्था आदी ठिकाणी दर शनिवारी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे. लसीकरण केंद्रांवर टोकन सिस्टीम सुरु केल्यामुळे नागरिकांची गर्दी टळून त्यांच्या वेळेचीही बचत होत आहे. लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी शिबिर मोडवर काम करणे आवश्यक आहे. त्यानुसार गॅस एजन्सी कर्मचारी, बँक कर्मचारी अशा विविध क्षेत्रांसाठी शिबिरांचे नियोजन करावे. कोरोना प्रतिबंधासाठी आघाडीवर कार्यरत आशा सेविका, आरोग्यसेविकांना मास्क आदी सामग्री नियमितपणे उपलब्ध करुन द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 *अनाथ बालक संगोपनासाठी कार्यवाही*

 कोविड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन होणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.

 कोरोनामुळे पालक अनाथ बालकांची माहिती वेळीच कळणे आवश्यक आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल बाधिताचे दुर्देवाने निधन झाल्यास त्याच्यावरील अवलंबितांची माहिती वेळीच डेथ फॉर्ममध्ये भरून घ्यावी. तशी प्रक्रिया रुग्णालयांनी वेळीच पार पाडून संबंधित बालकांबाबत टास्क फोर्सला तत्काळ कळवावे जेणेकरून संगोपनाबाबत पुढील प्रक्रिया गतीने होईल. यासाठी सर्व रुग्णालयांना सुस्पष्ट सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

              कोविडमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक मृत्यू पावले आहेत, अशी बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी व अनाथ बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती श्री. भडांगे यांनी दिली.
Previous Post Next Post
MahaClickNews